NDA Government oath taking ceremony: बिनशर्त पाठिंबा, तरीही राज ठाकरे यांना शपथविधीला का बोलावलं नाही? प्रकाश महाजन म्हणाले...
Maharashtra Politics: राज ठाकरे यांच्या मनसेला दिल्लीत NDA सरकारच्या शपथविधीला का बोलावले नाही? प्रकाश महाजन यांनी सांगितले कारण. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला कोणतीही अट न ठेवता महायुतीच्या उमेदवारांना मदत केली होती.
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणुकीत आमचे कार्यकर्ते राबले होते. त्यामुळे दिल्लीतील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी (NDA Government Oath Ceremony) आमंत्रण मिळाले असते तर आम्हाला आनंद झाला असता, असे वक्तव्य मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केले. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मनसे पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएमधील घटकपक्ष नाही. त्यामुळे दिल्लीतील एनडीएच्या समन्वय बैठकीला आम्हाला बोलावणे अपेक्षित नाही. पण एनडीए सरकारच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण देण्यात आले होते का, हे सांगणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कठीण आहे. पण निमंत्रण असते तर कुठं दिसले असते, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले.
गरज असल्यास उंबरठे झिजवायाचे आणि काम झाल्यावर दार लावायचे; प्रकाश महाजनांनी सुनावले खडे बोल
शपथविधीला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आनंद झाला असता. आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन महायुतीसाठी आमचे कार्यकर्ते राबत होते. निमंत्रण आले असते तर कुठं दिसले असते, मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आमंत्रण देण्यात विसरले असावेत. आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपली आहे. गरज असल्यास उंबरठे झिजवायाचे आणि काम झाल्यावर दार लावायचे. त्याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आहे. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती, आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता. राज ठाकरे यांना निमंत्रण होते की नाही, हे फक्त स्वतः राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सांगू शकतात, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले.
राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा आणि प्रचारसभा
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. एवढेच नव्हे तर राज ठाकरे कणकवलीत नारायण राणे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे, पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या सभेच्या व्यासपीठावरही राज ठाकरे दिसून आले होते. या सभेत राज ठाकरे यांना प्रोटोकॉल डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर भाषण करुन देण्यात आले होते. या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर प्रचंड स्तुतीसुमने उधळली होती.
आणखी वाचा