(Source: ECI/ABP News/ABP Majha)
''महिलांची डोकी फुटली तेव्हा निषेधसुद्धा नाही, पण बायको उमेदवार असल्याने मनोज जरांगेंची भेट''; ओमराजेंचा घणाघात
माझा प्रचार हा गेली पाच वर्षापासून चालू असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यानी शेवटच्या दिवशीही ग्रामीण भागात प्रचार सभांचा धडाका लावलाय
धाराशिव : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज सायंकाळी 5 वाजता 11 लोकसभा मतदारसंघातील (Lok sabha Election) प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे, उमेदवारही जोमाने प्रचार करताना दिसून येतात. धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) विरुद्ध अर्चना पाटील अशी दीर-भावजय यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे, या लढतीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अर्चना पाटील यांचे पती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली होती.आता या भेटीवरुन खासदार ओमराजे निंबाळकरांनी पटलवार केला आहे.
माझा प्रचार हा गेली पाच वर्षापासून चालू असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यानी शेवटच्या दिवशीही ग्रामीण भागात प्रचार सभांचा धडाका लावलाय. शनिवारी त्यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी धाराशिवमध्ये सभा घेतली. मोठ्या उत्साहात ही सभा पार पडली, त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी थेट मोदींवर हल्लाबोल केला. त्यानंतर, आज सकाळपासूनच ओमराजे निंबाळकर प्रचाराच्या कामाला लागला आहेत. यादरम्यान, त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. तर, अणदूर येथे जाऊन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या घरी जाऊनही भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राणा पाटलांवर घणाघाती टीका
आमदार राणा यांनी मनोज जरांगे पाटील यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यावर, आता ओमराजेंनी सडकून टीका केली आहे. ''मराठा आंदोलनात महिलांची डोकी फुटली तेव्हा आमदार राणा यांनी साधा निषेध केला नाही. मात्र, फडणवीस यांच्यावर जरांगे बोलले की बापाला बोलल्यासारखा राग आला आणि आमदार राणा यांनी काळा दिवस म्हणत निषेध करीत टीका केली. आता, स्वतःची बायको अर्चना लोकसभेला उभी असल्याने जरांगे यांना भेटण्यासाठी गेले, अशी घणाघाती टीक ओमराजेंनी आमदार राणा पाटील व मनोज जरांगे यांच्या भेटीवर केली. तसेच, अर्चना पाटील पडल्या की राणा यांना पळी चमच्याने मार आहे, म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी भेटायला गेले,'' असा खोचक टोलाही ओमराजेंनी लगावला.
ओमराजेंनी घेतली बाबुराव चव्हाण यांची भेट
नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांच्या भेटीसाठी ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या घरी भेट दिली.यावेळी, ओमराजेंनी सुनील चव्हाण यांचे बंधू बाबुराव चव्हाण यांची अणदूर या गावात भेट घेतली. निंबाळकर यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा रंगली असून ओमराजेंनी शेवटच्या टप्प्यात कार्यक्रम केला, अशी चर्चाही होत आहे. दरम्यान, चव्हाण परिवारात सुनील यांनीच फक्त भाजपात प्रवेश केल्याचे या भेटीनंतर स्पष्ट झाल्याचंही बोललं जात आहे.