Nawab Malik यांच्याविरोधात वाशिम पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
FIR Against Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. वाशिम पोलीस स्टेशनमध्ये नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
![Nawab Malik यांच्याविरोधात वाशिम पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल Washim News Atrocity case filed against NCP leader Nawab Malik in Washim Police Station Nawab Malik यांच्याविरोधात वाशिम पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/17/7fa7a8de632ae090ffea52738a556fe8166868251166783_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
FIR Against Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल झाला आहे. वाशिम (Washim) पोलीस स्टेशनमध्ये नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एनसीबीचे (NCB) तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह कुटुंबीयावर नवाब मलिक यांनी जातीवाचक टिप्पणी केल्याबद्दल वाशिम न्यायालयाने त्यांच्याविरोधात 'अॅट्रॉसिटी'अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता त्यांच्याविरुद्ध वाशिम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर वानखेडेंच्या चुलत भावाच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद
समीर वानखेडे यांचे चुलत बंधू संजय वानखेडे यांनी वाशिम न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. मात्र, समीर वानखेडे यांनी स्वतः प्रतिज्ञापत्र दाखल करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर समीर वानखेडे यांनी 24 ऑगस्ट रोजी स्वतः वाशिम न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यावर 15 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने नवाब मलिक यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार समीर वानखडे यांचे बंधू संजय वानखडे यांच्या फिर्यादीवरुन काल (16 नोव्हेंबर) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रऊफ शेख यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांची वानखेडेविरोधात टिप्पणी
समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात आरोपांची जंत्रीच सादर करत त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात जातीवाचक टिप्पणी केली. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ टीव्ही आणि यूट्यूबसह सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संजय वानखेडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली. या प्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक झाली होती. सध्या ते ईडी कोठडीतच आहेत. त्यामुळे आधीच ईडी कोठडीत असलेले नवाब मलिका यांची सुटका झाली तरी मात्र समीर वानखडे प्रकरण त्यांना चांगलंच भोवणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)