Vishwas Patil : बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी हेलिकॉप्टरने जाता अन् तमाशावर बंदी घालता, कलावंतांचा तळतळाट राजकर्त्यांना नडणार, विश्वास पाटलांची पोस्ट चर्चेत
Vishwas Patil : ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांच्या सामाजिक भूमिका नेहमीच चर्चेत असतात.
Vishwas Patil : ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांच्या सामाजिक भूमिका नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी अभिनेत्री कंगना रणौतला तिच्या अज्ञानाबद्दल झाप झापलं होतं. आता तमाशा कलाकरांच्या बिकट अवस्थेबाबत त्यांनी ट्वीटर पोस्टच्या माध्यातून भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात तमाशावर बंदी घालण्यात आल्याचा दावा करत, विश्वास पाटील यांनी सरकारला आणि प्रशासनला कलावंतांचा तळतळाट नडणार, असं म्हटलं आहे.
विश्वास पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी...
गरीब, दलित तमाशा कलावंतांचा तळतळाट राजकर्त्यांना व प्रशासकांना नडणार !
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी 106 हुतात्म्यांचा बळी घेणाऱ्या मोरारजी देसाई यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात #तमाशा कलेवर बंदी आणली होती. कालच सार्वत्रिक निवडणुकीचे कारण सांगून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तमाशावर बंदी घातली गेल्याची बातमी कानावर आली आहे.
रात्रीच पश्चिम महाराष्ट्रातील सत्तरीच्या उंबरठ्यावरील एका तमाशा सम्राटाचा मला फोन आला. तो थोर कलावंत फोनवरंच ओक्साबोक्सी रडत मला सांगत होता, “ साहेब कोरोनाच्या नावाखाली तीन तीन सिझन फड बंद पडला. आता चैत्री जत्रांचा हंगाम आला आणि पुन्हा शासनाने तमाशाचा गळा दाबला. फडातले सारे कलावंत घेऊन आम्ही कलावंतांनी आमची मथुरा कोणत्या नदीच्या डोहात बुडवायची हो ?”
कोणतीही निवडणूक आली की, रस्तोरस्ते दारूचा महापूर वाहतो. तमाशा सारख्या गोरगरिबांच्या, दलितांच्या लोककलेवर बंदी आणु पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी निवडणूक होईपर्यंत हिम्मत असेल तर संपूर्ण दारूबंदीची मोहीम यशस्वी करून दाखवावी.
वर्षभर रोजगार हमीवर काम करणाऱ्या व चैत्राच्या मोसमात गावोगाव छोटे तमाशाचे फड उभे करून आपल्या पोटाची खळगी कशीबशी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सुमारे दहा हजार लोककलावंतांनी जायचे कुठे, खायचे काय आणि जगायचे तरी कसे ?
महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना आणि प्रशासकांना मी रेठरे हरणाक्षेचे शाहीर पट्ठे बापूराव कुलकर्णी यांची आठवण करून देतो. दोन लाख #लावण्या लिहिणाऱ्या या शाहीराने ब्रिटिशांच्या न्यायालयात आपल्या तमाशा कलेची कैफियत मोठ्या अभिमानाने पेश केली होती
“श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनी
सोवळे ठेवले घालून घडी
मशाल धरली हाती तमाशाची
लाज लावली देशोधडी !”
महाराष्ट्राचे कर्तबगार माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई. ते कोल्हापुरात सर्किट हाऊसवर मुक्कामाला होते. तेथे त्यांना जोतिबाच्या जत्रेची कोणीतरी आठवण करून दिली. तेव्हा बाळासाहेबांनी रात्री जाऊन जोतिबाच्या डोंगरावर काळू बाळू तमाशा मंडळाचा “ राजा हरिश्चंद्र नावाचा अप्रतिम पौराणिक वग पाहिला होता.
तेव्हा स्वतः तमाशाच्या मंचावर जाऊन त्यांनी सर्व कलावंतांना फेटे बांधून त्यांचा जाहीर सत्कार केला होता. आता योगायोगाची गोष्ट म्हणजे याच बाळासाहेबांचे नातू शंभूराजे देसाई हे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत.
भारत चीन युद्धानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री यशवंतराव_चव्हाण यांनी नेफा आघाडीवर जवानांच्या मनोरंजनासाठी काही कलावंतांना पाठवले होते. ज्यामध्ये आमच्या तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर होत्या. तेव्हा विठाबाईंनी आपल्या धमाल नृत्त्याने वैजयंतीमालेचा सुद्धा दिमाख हिरावून घेतला होता.
शरद पवार साहेबांचे मूळ गाव म्हणजे बारामती नव्हे, तर सातारा जिल्ह्यातील नांदवळ. हे नांदवळ गावच तमाशाची एक पंढरी मानली जाते. आता तिथे नांदवळकर या लोककलावंताची चौथी पिढी तमाशा सादर करते आहे. महाराष्ट्रातील विशेषत: दलित व भटक्या समाजातील अशिक्षित, कमशिक्षित गरीब कलावंतानी महाराष्ट्राची ही अभिजात कला, पोटाला चिमटे देऊन पिढ्यानपिढ्या जपून ठेवली आहे. केवळ निवडणुकीच्या नावावर त्यांच्या पोटावर गंडांतर येत असेल तर चांगले नव्हे. संबंधितांची ही करनी आमच्या शेकडो हुतात्म्यांचा बळी घेणाऱ्या मोरारजी सारखीच भयंकर ठरणारी आहे.
महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते बॉलिवूड मधील कलावंतांच्या मुलांची लग्न, वाढदिवस गाठण्यासाठी नेहमीच हेलिकॉप्टर व विमानाने पोहोचायची घाई करतात. पण आपण ज्या बहुजन समाजातून आलो. आपले वडील, आजोबा चुलतेमालते ज्या लोककलेवर पोसले. त्याच कलेला आज असे वैधव्य येणार असेल तर काय समजावे?
गरीब, दलित #तमाशा कलावंतांचा तळतळाट राजकर्त्यांना व प्रशासकांना नडणार !
— Vishwas patil (@AuthorVishwas) April 11, 2024
—#विश्वास_पाटील
संयुक्त #महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी 106 हुतात्म्यांचा बळी घेणाऱ्या मोरारजी देसाई यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात #तमाशा कलेवर बंदी आणली होती. कालच सार्वत्रिक… pic.twitter.com/KEyGbqbyC1
इतर महत्वाच्या बातम्या