KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
KDMC illegal building : कल्याण डोंबिवलीत बेकायदेशीर इमारती या कोणाच्या आशीर्वादाने उभ्या आहेत, बँका त्यांना कर्ज कशा देतात असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
ठाणे: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बांधण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारती येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाच पुन्हा महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर एक बहुमजली इमारत उभी असल्याचं समोर आलं आहे. या बेकायदेशीर इमारती कोणाच्या आशीर्वादाने उभ्या राहतात, बँका त्यांना कर्ज कशा देतात असे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत. तसेच कल्याण डोंबिवली मनपा अधिकारीही संशयाच्या भावऱ्यात अडकले आहेत.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळाल्याचे भासवून 'रेरा' प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविणाऱ्या इमारतींच्या बाबतीत न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. कल्याण पश्चिम मधील मौलवी कंपाउंड जवळील दहा मजली इसुफ हाइट इमारत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर उभी आहे.
सलमान अनिस डोलारे या बांधकाम व्यावसायिकाने आरक्षित जागेच्या लगत असलेल्या भूखंडावर चार मजली इमारतीची मनपा कडून परवानगी घेऊन इमारत उभी केली होत. त्याच इमारतींवर सहा मजले बेकायदेशीर मजले चढवले. शिवाय या इमारतीच्या बाजूला असलेल्या केडीएसीच्या आरक्षित भूखंडावर दहा मजली इमारत उभी केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खेळाच्या आणि बेघर असलेल्या नागरिकांना घरे बांधण्यासाठी आरक्षित असलेल्या सर्व्हे नंबर 97, 98 वर दहा मजली अनधिकृत इमारत उभी केली. कल्याण डोंबिवली मनपाला तक्रार प्राप्त झाल्यावर पालिकेने भूखंडाची पाहणी करून सलमान अनिस डोलारे या बांधकाम व्यावसायिकवर गुन्हा दाखल केला.
धक्कादायक म्हणजे ही इमारत 2012 साली उभी राहिली असल्याचे समोर आले आहे. या इमारतीला 12 वर्षांचा कालावधी उलटून गेल्यावर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही इमारत आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या बांधकामाला मनपा अधिकारी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी सांगितले. विशेष म्हणजे सलमान डोलारे याच्यावर चार बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी या आधीच गुन्हे दाखल आहेत. 5 फेब्रुवारी 2024, 8 ऑगस्ट 2024, 29 ऑक्टोबर 2024 आणि 10 डिसेंबर 2024 असे चार गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून या प्रकरणी सादर करण्यात आलेली बोगस कागदपत्रे मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे सलमान डोलारे याने कल्याण कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी आज झाली असून पुढील 19 डिसेंबरला अटकपूर्व जामिनासाठी पुन्हा सुनावणी होणार आहे. हा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळून लावण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोर्टात अर्ज दाखल केला आहे अशी माहिती या गुन्ह्याचा तपस करणारे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांनी फोद्वारे दिली आहे.
कल्याण डोंबिवली मनपा अतिरिक्त आयुक्त योगेश गोडशे यांनी कर्ज देणाऱ्या बँकांना आवाहन केले आहे की कर्ज देण्यागोदार मनपाच्या वेबसाईटवर इमारतीच्या परवानग्यांची खात्री करून ग्राहकांना कर्ज द्यावे.
आतापर्यंत अनधिकृत बांधकाम इमारतीमध्ये फ्लॅट धारकांना बँकेने कर्ज बांधकाम व्यावसायिक आणि बँक अधिकारी यांच्या साटेलोटे असल्याने मिळत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे या बेकायदा इमारती बांधकाम प्रकरणात एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने आर्थिक गुंतवणूक केल्याची चर्चा रंगली आहे.