Vijay Shivtare VIDEO : अजित पवारांना गुर्मी, त्यांना कसलीही माणुसकी नाही, त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य ; विजय शिवतारेंनी सगळी भडास काढली
Vijay Shivtare Vs Ajit Pawar : अजित पवारांनी बारामती एसटी स्टँडसाठी 60 कोटी दिले, पण साडे चार लाख लोकांच्या घरी पाणी पोहोचवणाऱ्या योजनेचे 25 कोटी थांबवून ठेवले असा आरोप विजय शिवतारे यांनी केला.
पुणे : अजित पवार (Ajit Pawar)हे कसलीही माणुसकी नसलेले व्यक्ती आहेत, त्यांना प्रचंड गुर्मी आहे असं सांगत या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव होणार हे त्रिवार सत्य असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केलंय. बारामतीतून मी बंड करत नाही, पवारांना नाकारणाऱ्या मतदारांसाठी मी निवडणूक लढवतोय असंही ते म्हणाले. 'एबीपी माझा'शी बोलत असताना त्यांनी अजित पवारांवर चौफेर टीका केली.
काय म्हणाले विजय शिवतारे?
माझं हे बंड नाही, पवारांच्या विरोधात बारामती मतदारसंघात साडे पाच लाख मतदार आहेत. पवारांचे समर्थन करणारे मतदार दोन भागात विभागतील, तर मग विरोध करणाऱ्या मतदारांनी काय करायचं? त्यामुळे पवारांना नाकारणाऱ्या मतदारांसाठी मी निवडणूक लढतोय.
अजित पवारांनी गुर्मी
अजित पवार युतीमध्ये आल्यानंतर मी स्वतः त्यांना भेटायला गेलो, त्यांचं स्वागत केंल. पण त्यांची गुर्मी कधी जाणार नाही. माझ्याकडून हे काम करून घेण्यासाठीच मला ही संधी मिळत आहे. 2014 साली महादेव जानकरांच्या ठिकाणी मी उभा असतो तर त्याचवेळी मी निवडून आलो असतो. बारामती कुणाचा सातबारा नाही, घराणेशाहीच्या विरोधात हा लढा आहे. या निवडणुकीकडे मी वैयक्तिक वैर म्हणून लढत नाही.
नमो रोजगार मेळाव्याच्या वेळी तीन बुके घेऊन मी गेलो होतो. अजित पवारांना बुके दिल्यावर त्यांनी तो लगेच बाजूला ठेवला, त्यांना कसलीही माणूसकी नाही. एवढा गर्व मी कुठेच पाहिला नाही.
पुण्यात कुणालाही मोठं होऊ दिलं नाही
अनंतराव थोपटे हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असं सोनिया गांधी यांनी 1999 साली जाहीर केलं होतं. त्यावेळी शरद पवारांनी त्यांना निवडणुकीत पाडलं आणि त्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हिरावून घेतली. शरद पवारांनी पुण्यात कुणालाही मोठं होऊ दिलं नाही.
अजित पवार पडणार हे नक्की
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला समजावलं. युतीधर्म पाळला पाहिजे, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना दिलेला शब्द पाळला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक खासदार महत्त्वाचा आहे. त्यावर मी सांगितलं की, मी जरी निवडणुकीला राहिलो नाही तरी मतदार हे अजित पवारांच्या विरोधात मतदान करतील, अजित पवारांची जागा नक्की पडणार. अजित पवार जिंकू शकणार नाहीत हे त्रिवार सत्य आहे.
साडेचार लाख लोकांच्या पाण्यासाठीचे 25 कोटी अडवले
गुंजवणीच्या धरणासाठी मी 2012 साली नऊ दिवस उपोषण केलं होतं. पण पालकमंत्री असताना अजित पवार तिकडे आले नाहीत. शिवतारे मरतोय तर मरू दे अशी त्यांची भाषा होती. त्या उपोषणामुळे माझी किडनी फेल गेली, ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. कदाचित अजित पवार यांना पाडण्यासाठीच देवाने मला वाचवलं होतं असं वाटतंय.
अजित पवारांनी बारामती एसटी स्टँडसाठी 60 कोटींचा निधी दिला, पण साडे चार लाख लोकांना पाणी पुरवण्याच्या योजनेसाठी 25 कोटी निधी दिला नाही, तो अडवून ठेवला. अजित पवारांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं.
देवेंद्र फडणवीसांना सांगणार, अजित पवार पडतील
जर देवेंद्र फडणवीसांनी भेटायला बोलवलं तर मी त्यांना सांगेन, मी जरी राहिलो नाही तरी अजित पवार पडतील. सुप्रिया सुळे या सहज निवडून येतील. त्यामुळे मला अपक्ष उभारू द्या, मी आपलाच आहे. मी निवडून येईन.
ही बातमी वाचा :