Prakash Ambedkar : भाजपने स्वत:सह संघाच्या स्वयंसेवकांचीही गोची केली; प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका
Prakash Ambedkar : भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तेच आज पक्षात आल्याने संघाच्या स्वयंसेवकांची पूर्णतः कोंडी झाल्याची खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
अकोला : भाजपच्या (BJP) सध्याच्या निर्णयामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची प्रचंड मोठी कोंडी झाली आहे. संघाचा कार्यकर्ता हा त्याच्या वैचारिक मतांशी एकसंघ राहिला आहे. कधीकाळी भाजपनेच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते नेतेच आज भाजपमध्ये आल्याने या स्वयंसेवकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकीकडे तुम्हाला स्वतःचं असं अस्तित्व असताना तुम्हाला का पक्षाने डावललं याचे उत्तर संघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना द्यावं लागत आहे.
मात्र, त्याच्याकडे या परिस्थितीचं कुठलेही उत्तर नाहीये. या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते असताना त्यांना कदाचित संख्याबळासाठी भाजपने शामिल केले असले तरी भाजपच्या या निर्णयामुळे संघाच्या स्वयंसेवकांची पूर्णतः कोंडी झाल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपवर टीका केली आहे. सध्याघडीला भाजपच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची मोठी अडचण झाली असून ते या प्रकाराचा निषेधही करू शकत नाही आणि समर्थनही करू शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
चंद्रहार पाटलांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला
सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेसमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. यावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चंद्रहार पाटलांनी स्वतः च स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. तीन महिन्याआधी ते माझ्याकडे येऊन गेले होते. त्यावेळी त्यांना मी सुचवलं होतं की, पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक तीन गावाच्या मागे एक तालीम आहे. त्यामुळे हे तालीम किंवा आखाडे हा तुमचा बेस बनवा. त्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी स्थानिक स्तरावर काम केले.
शिवसेनेने त्यांना बाटवण्याचा प्रयत्न केला
मात्र, दरम्यानच्या काळात शिवसेनेने त्यांना बाटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पूर्वी मी त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचे बोललो होतो. मात्र आता शिवसेनेने तो प्रयत्न केल्याने कदाचित मी त्यांच्या पाठीशी त्या ताकदीने उभे राहणार नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यामुळे चंद्रहार पाटील सरळ मार्गाने जिंकून येत असताना त्यांना आता संघर्ष करावा लागणार आहे. परिणामी ते संघर्ष करूनही जिंकतात का हा मोठा प्रश्न असल्याची शंकाही प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या