Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Chhagan Bhujbal : महायुतीसोबत आम्ही एकमेकांसोबत काम करतो, अशी प्रतिक्रिया खासदार प्रफुल पटेल यांनी दिली. भुजबळ आज सकाळी सीएम देवेंद्र फडणवीस आणि सायंकाळी शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर होते.
Chhagan Bhujbal : भुजबळ साहेब सामाजिक चळवळीचे एक मोठे नेते आहेत. ओबीसी आणि गोरगरिबांसाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं आहे. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्या निमित्तानं मुख्यमंत्री सोबत ते एकत्र आहेत. शरद पवार साहेब आणि भुजबळ साहेब हे कुठेही सामाजिक क्षेत्रात एका मंचावर एकत्रित येणं यात वेगळा अर्थ काढण्याचा काही अर्थ नाही. भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत काम करत आहे. त्यांची जेवढी जवळीकता भाजपसोबत आहे, आमची सुद्धा तेवढी आहे. महायुतीसोबत आम्ही एकमेकांसोबत काम करतो. अशी प्रतिक्रिया खासदार प्रफुल पटेल यांनी दिली आहे. भुजबळ आज सकाळी सीएम देवेंद्र फडणवीस आणि सायंकाळी शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर होते.
गडचिरोली विकसित झालं पाहिजे हे सगळ्यांच्या मनात
पटेल म्हणाले की, गडचिरोलीसारख्या नक्षल आणि मागास जिल्ह्यात एवढ्या मोठ्या लोखंडाची खाण असल्यामुळे विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात हा स्टील परिसर म्हणून ओळखल्या जाणार आहे. फडणवीस साहेबांनी यामध्ये विशेष करून लक्ष घातलं आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित दादांनी पण विशेष लक्ष घातलं आहे. गडचिरोली विकसित झालं पाहिजे हे सगळ्यांच्या मनात आहे. आज कोणी काम करत असेल, सरकार काम करत असेल, त्याची स्तुती करणं एक चांगली गोष्ट आहे. किमान त्यांना समजलं तरी, जे कोणी विकास करत असेल त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असे ते म्हणाले.
तोपर्यंत टीका करणं योग्य नाही
बीडच्या प्रकरणात धनंजय मुंडे असो किंवा कुणीही ज्यांच्यावर जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्यांच्याबाबत असं वक्तव्य किंवा टीका करणं योग्य नाही. आमची आणि सर्व महाराष्ट्राची एक इच्छा आहे गुन्हेगाराला पकडलं पाहिजे. पकडलेल्यांची एसआयटीच्या माध्यमातून योग्य चौकशी झाली पाहिजे. आणि चौकशीतून जे काही दोषी आढळतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणात कुणाचाही अदृश्य हात असल्याचं सिद्ध झाल्यास त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. परंतु आज कुणाचं नाव घेऊन किंवा त्याच्या राजीनाम्याची मागणी करणं उचित नसल्याचे ते म्हणाले.
अजूनपर्यंत असा कुठलाही पुरावा आलेला नाही, किंवा कुणी त्यांचं नावं घेतलेलं नाही. त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं केलं असेल हे उद्या चौकशीत सिद्ध झाले की कुणाचं हात होता आणि मास्टरमाईंड कोण होता तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की, आम्ही एसआयटीच्या माध्यमातून पूर्ण चौकशी करू, पूर्ण कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही, असे पटेल म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या