Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर असलेली सुरक्षा सुद्धा काढून टाकावी, कुठली सुरक्षा ठेवण्यात येऊ नये असं सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
Bachchu Kadu : प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित अत्यंत कठोर शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. दिव्यांगांशी बेईमानी कदापि शक्य नसल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी पदाचा राजीनामा देताना मंत्रालय स्थापन झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर असलेली सुरक्षा सुद्धा काढून टाकावी, कुठली सुरक्षा ठेवण्यात येऊ नये असं सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. दिव्यांगांसोबत बेईमानी कदापि शक्य नाही म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटल आहे.
मानधन कधीच वेळेवर मिळत नाही
बच्चू कडू यांनी मंत्रालय निर्मितीनंतर आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा आहेत त्या मिळाल्या नसल्याने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनी आपल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे की, इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे. मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नसल्याकडे कडू यांनी लक्ष वेधलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाच टक्के निधी खर्च केला जात नसल्याचे त्यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.
पदावर राहून आंदोलने करू शकत नाही
आपल्या पत्रामध्ये ते पुढे म्हणतात की, अजूनही स्वतंत्र मंत्री आणि सचिव पण या मंत्रालयासाठी नेमण्यात आलेला नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय सुद्धा नाही. पदभरती सुद्धा करण्यात आलेले नाही. इतर अनेक गोष्टी झाल्या नसल्याचे बच्चू कडू यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे या पदावर राहून ते होणार अशी शक्यता मावळली आहे. म्हणूनच दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलने करावी लागणार असल्याने पदावर राहून आंदोलने करू शकत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या