(Source: Poll of Polls)
मोदी आणि भाजप व्हॅक्युम क्लीनर, उद्धव ठाकरेंचा भाजप जोरदार निशाणा; इलक्ट्रोल बॉण्डच्या मुद्द्यावरुनही टीकास्त्र
Uddhav Thackeray On PM Modi and BJP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल गीत लाँच झालं, त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व्हॅक्युम क्लीनर (Vacuum Cleaner) असल्याची टीका करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. इलक्ट्रोल बॉण्डच्या मुद्द्यावरुनही ठाकरेंनी टीकास्त्र डागलं आहे. इलक्ट्रोल बॉण्ड जगातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे, याला मोदी गेट असं नाव दिलंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मशाल गीत लाँच झालं, त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मोदी आणि भाजप व्हॅक्युम क्लीनर
भाजप हा व्हॅक्युम क्लीनर झाला आहे, मोदी व्हॅक्युम क्लीनर इकडे-तिकडे फिरत आहे. जिथे-जिथे भ्रष्टाचार आहे, ते हा व्हॅक्युम क्लीनर शोधून काढत आहे. प्राण जाये वचन ना जाये, असा त्यांना कळलं असतं तर, अडीच -अडीच वर्षे सरकार मान्य झालं असते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींवर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हटलं की, आमचा वचननामा जाहीर करताना आम्ही पेपर फोडणार नाही. लवकरच जाहीरनामा प्रसिद्ध होईल. काँग्रेसने जाहीरनामा जाहीर केलेला आहे. आता राज्यातील मुद्दे घेऊन संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करू, असंही त्यांनी सांगितलं आहे. संयुक्त सभा सुद्धा आम्ही लवकरच घेऊ, निवडणूक आहे त्यामुळे गरज असेल तर, वेगळा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध करू, असंही ठाकरे म्हणालेत.
इलक्ट्रोल बॉण्ड जगातील सगळ्यात मोठा घोटाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, इलक्ट्रोल बॉण्ड प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने समोर आणलं आहे. इलक्ट्रोल बॉण्ड जगातील सगळ्यात मोठा घोटाळा आहे, याला मोदी गेट असं नाव दिलंय. आता विरोधक यांना पच्छाताप होईल, कारण हे प्रकरण आधी समोर का आला नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
विशाल पाटीलांच्या बंडखोरीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
सांगलीतून काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना, याचा महायुतील फटका बसणार नसल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. विशाल पाटील निवडणूक लढावत असतील तर, त्याचा फटका बसणार नाही. जागावाटप झालेलं आहे,जर बंडखोरी होत असेल तर, त्या-त्या पक्षाने संबंधित नेत्यांना समजून सांगितलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हुकूमशाहीला आव्हान देण्याचं जनतेला आव्हान
ही लढाई हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे. देश वाचविण्यासाठी एकत्र यावं, असं आवाहन करतोय. हुकूमशाहीला आव्हान देण्याचं आव्हान जनतेला असेल. माझं टार्गेट 48 असेल, आम्ही 48 जागा जिंकू. विनोद घोसाळकर माझ्यासोबत आहेत, ते कुठेही जाणार नाहीत. तीन टक्के ज्यांच्यावर ईडी कारवाई झाली, त्यातील किती लोकांना पंतप्रधान यांनी भाजपने घेतलं आहे, असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :