Uddhav Thackeray : इनकमिंग सुरु झालं पण उद्धव ठाकरेंनी अटी सांगितल्या, शिंदेंची साथ देणाऱ्या आमदारांना नो एंट्री, 'या' नेत्यांसाठी दारं खुली
Uddhav Thackeray : डोंबिवलीतील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेते पुन्हा प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदारांना नो एंट्री असल्याचं स्पष्ट केलं.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे (Deepesh Mhatre) यांच्यासह 7 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांचं स्वागत करताना आगामी काळात कुणाला परत प्रवेश देणार हे सांगितलं. मात्र, याचवेळी उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी पलीकडे गेलेल्या आणि शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना पुन्हा प्रवेश नाही, असं म्हटलं. यावेळी उद्धव ठाकरे यांचा रोख आमदारांकडे होता. त्यामुळं आगामी काळात उद्धव ठाकरे आणखी कोणत्या नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान देणार हे पाहावं लागणार आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आज अनेक जण पुन्हा आपल्या घरात येत आहेत, ही चांगली गोष्ट झाली आहे. मी बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्वापासून शिवसेना दूर नेली या भ्रमाला अनेक जण भुलले आणि अनेकांनी त्यांच्या पालख्या वाहिल्या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले, तुम्ही ज्याच्या आहारी गेला होतात हे हिंदुत्व, ही शिवसेना आपली नाही, हा बाळासाहेबांचा विचार नाही, महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार नव्हता, बाळासाहेबांचा विचार घेऊन शिवसेना पुढं नेतोय, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं.
कल्याणकरांनी चार लाखं मतं दिली
उद्धव ठाकरे पुढं म्हणाले, अनेक शेळ्या शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत आहेत. दीपेश म्हात्रे यांनी थोडा अगोदर निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, जुलूमशाही लोकसभेत गाडून टाकली असती. कल्याणमधील शिवसेना प्रेमी मतदारांचा अभिमान आहे. एका बाजूला पैसा, ताकद, झुंडशाही असून सुद्धा आपल्या कार्यकर्तीला चार लाख मतं दिली. समोरच्या बाजूनं मुख्यमंत्र्यांचं कार्ट होतं, प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली. साध्या कार्यकर्तीला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं. कल्याणकरांनी चार लाखं मतं आपल्या भगव्याला दिली, असं ठाकरेंनी म्हटलं.
पुन्हा कुणाला सोबत घेणार तेही सांगितलं
आज तुम्ही परत आला आहात, गद्दारांनी आपलं सरकार पाडलं, शिवसेना संपवायला निघाले आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत घेणार नाही, तिकडे बसलेत त्यांना उमेदवारी देणार नाही. तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते धाकदपटशाह असेल, दिशाभूल झाली असेल म्हणून तिकडे गेले असतील त्यांना परत घेणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात माझ्या कार्यकर्त्यांभोवती मोहजाल टाकलं गेलं, तिकडं खेचलं गेलं त्यांचे डोळे उघडल्यानंतर परत येत आहेत त्या सगळ्यांचं शिवसेनेत स्वागत करणार आहे. जे पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले, सत्तेची पदं भोगतात, महामंडळ वगैरैच्या खिरापती सुरु आहेत, अशा गद्दारांना परत घेणार नाही.
आज तुम्ही सगळे परत आलेला आहात, कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेचा हिंदुत्वाचा अन् भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथला भगवा ज्यांनी त्याला गद्दाराची डाग लावला तो डाग धुवून टाका, भगव्याचं तेज परत एकदा प्रज्वलित करा मशालीच्या रुपानं अशी तुम्हाला शिक्षा देत आहे. बाकीच्यांना विनंती करतो पण दीपेशला शिक्षा करणार, यापूर्वी जितकं काम करत होता त्यापेक्षा शतपटीनं जास्त काम करा, पूर्ण कल्याण डोंबिवली शिवसेनामय करा,येत्या निवडणुकीत ते करुन दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर बातम्या :