मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. त्यानंतर, शिवसेनेच्या शिवालय जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अंतिम टप्प्यातील या जागावाटपावरुन पक्षांमध्ये कुरबुरी आणि ओढाताण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांच्यात वाद झाल्याचे समजते. कारण, राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं. त्यावर, नाना पटोले यांनीही थेट पत्रकार परिषदेतूनच पलटवार केला आहे. त्यामुळे, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांमधील वादावर आता वरिष्ठांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच ह्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. तर, दुसरीकडे शरद पवारांनीही दिल्लीतील नेत्यांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. त्यानंतर, शिवसेनेच्या शिवालय जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, मविआ नेत्यांची ही पत्रकार परिषद चर्चेत राहिली ती, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या विसंवादामुळे. संजय राऊत हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांबद्दलची नाराजी उघड केली. त्यामुळे, पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. त्यासंदर्भात आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजन हा पूर्वीचा आमचाच आहे, त्याच्याप्रमाणे शिवसेनेचे इतही कार्यकर्ते परत येतील, असे उद्धव ठाकरेंनी पक्षप्रवेशानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. दरम्यान, यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वादाबाबतही उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मी याबाबत माहिती घेईन आणि तुमच्याशी बोलेन, असे एका वाक्यात उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. तसेच, जागावाटपावेळी खेचाखेची होत असते, पण ती तुटेपर्यंत तानायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जास्त पक्ष असल्यावर ओढाताण होत असते प्रत्येक पक्षाला जागा हवी असते. मात्र, ओढाताण होत असताना ती ओढाताण एवढी होऊ नये की ती तुटेल याचं भान सर्व नेत्यांना असायला हवं,असेही ठाकरेंनी म्हटलं. दुसरीकडे शरद पवार यांनीही मध्यस्थीसाठी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करुन चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान, उद्या तर उद्या किंवा दोन ते तीन दिवसांत महाविकास आघाडीतील जागावाटप होईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
शरद पवारांचाही दिल्लीत फोन
महाविकास आघाडीतील जागा वाटपावरुन काँग्रेस व शिवसेनेत सुरू असलेल्या वादावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत वाद विकोपाला जात असताना आता शरद पवारांनी मध्यस्थी केल्याचे समजते. शरद पवारांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला आणि के सी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे.