मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून 1500 देऊन घरी बसवली; ठाकरेंचा घणाघात
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतील मतदान करण्याचं आवाहन केलं जातंय. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुकलं असून पुन्हा एकदा महायुती सरकार व भाजपवर हल्लाबोल केला आहे. दादरमध्ये राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेला सुरुवात झाली असून या परिषदेमध्ये नागरी व सामाजिक संघटना, विचारवंत, साहित्यिक कलावंत कार्यकर्ते यांच्यासमक्ष भाषण करताना उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजना, भ्रष्टाचार, हरयाणा-जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल, महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपद आणि केंद्रातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सध्या लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घेऊन महिलांना आकर्षित केलं जात आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतील मतदान करण्याचं आवाहन केलं जातंय. त्यावरुन, उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.
राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, तुषार गांधी, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांसमक्ष भाषण करताना उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. जुमलेबाजीमध्ये लोकं बघत आहेत, एक एक योजना जाहीर करताय आणि समारंभ करत आहेत. या कार्यक्रमातून विचारतात, मिळाले का पैसे तुम्हाला? अरे तुझ्या घरचे पैसे आहेत का? तू गद्दारी केली 50 कोटी घेतले आणि बहिणीला 1500 रुपये देतो, असे म्हणत लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनात शिंदेंवर हल्लाबोल केला. तसेच, 70 हजार कोटींचा घोटाळा आता लाजतो, एवढे घोटाळे यांनी केले आहेत. जाहिरात एवढी करताय, बजेट केवढं असेल? सरकारवर नसला तरी सरकारी जाहिरातींवर लोकांना विश्वास आहे. फेक नेरेटिव्ह जाहिरातीतून हे बिघाडी सरकार पसरवत आहेत. तुम्ही गावागावात जा आणि होऊ दे चर्चा कार्यक्रम करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. मुलगी शिकली प्रगती झाली आणि काम नाही म्हणून 1500 रुपये देऊन घरी बसवली, कारण काम नाहीये, अशा शब्दात लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केलीय.
सगळे महाराष्ट्रचे उद्योग गुजरातला गेले, तुषार जी हे मी नाही म्हणत तुमच्या भाषेत जे दोन ठग आहेत ते हे विष कालवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने भाजपला गुडघ्यावर बसवलं आहे, योजना आहेत पण धोरण नाही, किती काळ 1500 रुपये घेऊन आपली बहीण बेक्कार भावाला सांभाळणार. जशी क्रांती आधी बुलेटने झाली, ती आता बॅलेटने करायची आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.