उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला मोठे धक्के; राजन तेली अन् दीपक आबा साळुंखे शिवसेनेत प्रवेश करणार
Uddhav Thackeray Shivsena : उद्धव ठाकरेंनी महायुतीला मोठा धक्का दिलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दीपक आबा साळुंखे आणि भाजप नेते राजन तेली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
Uddhav Thackeray Shivsena, Mumbai : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी महायुतीला दुहेरी धक्का दिलाय. माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन तेली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडलेले दीपक आबा साळुंखे गुरुवारी (दि.17) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अनेक वर्षांनी ते पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते हातात मशाल घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित गुरुवारी (दि.17) दुपारी चार वाजता हा पक्षप्रवेश मातोश्री येथे पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजन तेली यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवारांची साथ सोडलेली सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांचा उद्या दुपारी तीन वाजता मातोश्री येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. एबीपी माझा ने दिलेल्या माहिती खरी होत असून सांगोल्यात महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहे. सांगोला हा पारंपारिक शेतकरी पक्षाचा बालेकिल्ला असून आता उद्धव ठाकरे गटाने या जागेवर हक्क सांगत दीपक साळुंखे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष बंड करण्याच्या तयारीत असणार आहे. जर महाविकास आघाडीने अन्याय केला तर आम्ही सांगोल्यात लाल बावटा फडकाऊ असा इशारा शेकापच्या अनिकेत देशमुख यांनी दिला होता.
शिवसेनेचे स्टार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात आता त्यांचेच गेल्या वेळचे सहकारी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. एबीपी माझाने वर्तविलेल्या भाकितानुसार दीपक साळुंखे हे अजित पवार यांची साथ सोडून आता उद्धव ठाकरे यांची मशाल हातात धरणार आहेत. उद्या मातोश्री येथे दुपारी तीन वाजता दीपक साळुंखे पाटील यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होत असून यासाठी सांगोल्यातून 200 पेक्षा जास्त गाड्या घेऊन साळुंखे यांचे समर्थक मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता सांगोल्यामध्ये शहाजी बापूंच्या विरोधात दीपक साळुंखे अशी लढत दिसण्याची शक्यता असून शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई रंगतदार असणार आहे.
या घडामोडीमुळे महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होत असून गेले साठ वर्षापेक्षा जास्त काळ शेकापचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघात यावेळी उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरणार आहे. याच मतदारसंघातून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी तब्बल 55 वर्ष विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांना तिकीट डावल्याने त्यांनी ऐनवेळी महायुतीचे शहाजीबापू पाटील यांचा प्रचार केला होता. या निवडणुकीत शहाजी बापू हे केवळ 768 मतांनी विजयी झाले होते. आता दीपक साळुंखे यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष असणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या