'या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार', दानवेंची राज्य सरकारवर टीका
Aurangabad Water Issue: औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन आक्रमक भूमिका घेत भाजप आज रस्त्यावर उतरली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट ते औरंगाबाद महापालिका कार्यालयापर्यंत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे.
Aurangabad Water Issue: औरंगाबादेत सात-सात दिवसानंतर पाणी मिळतं. हे सरकार महाविकास आघाडीचे सरकार नाही. या सरकारचं नाव जुम्मे के जुम्मे सरकार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर केली आहे. औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन आक्रमक भूमिका घेत भाजप आज रस्त्यावर उतरली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पैठणगेट ते औरंगाबाद महापालिका कार्यालयापर्यंत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित सभेत दानवे असे म्हणाले आहेत.
रावसाहेब दानवे म्हणाले की, ''या सरकारला महाविकास आघाडीचे सरकार म्हणायचे नाही. हे सरकार अमर,अकबर, अँथनीचे सरकार आहे. हे कधीच एकत्र बसत नाही. कोणताच निर्णय घेत नाही. यामुळे या राज्याचा एकही प्रश्न सुटला नाही आणि जे आपल्याला जमलं नाही, त्याच खापर केंद्रवार फोडतात.''
दानवे म्हणाले, ''पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सांगण्याची गरज नाही. समांतर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली (औरंगाबादेत भाजपचे महापौर होते त्यावेळी) होती. मात्र ही योजना यांच्यामुळे (शिवसेना) रद्द झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली होती. सरकार बदलले, युती भाजपशी होती, लोकांनी मत आम्हाला दिली. मात्र आमचे मतं चोरीला गेली. मात्र चोराला शिक्षा आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपल्याला द्यायची आहे.''
दानवे पुढे म्हणाले की, ''हे सरकार तुरुंगातून कारभार चालवत आहे, घरातून कारभार चालवत आहेत. यांचे दोन मंत्री तुरुंगात आहेत आणि मुख्यमंत्री आपल्या घरात.'' ते म्हणाले, कोरोना काळात राज्याचे विरोधी पक्षनेते शेतकऱ्यांकडे गेले, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मात्र मुख्यमंत्री घराबाहेर पडले नाही. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिली की, माझं कुटुंब, माझी जबाबदारी. 12 कोटी लोकं तुमच्या कुटुंबाचे आहेत. तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी नाही. आमचे लोक रस्त्यावर उतरले, शेतकऱ्यांकडे गेले. तेव्हा आमचे नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मुख्यमंत्री घरात, आम्ही तुमच्या दारात.''