Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sushma Andhare: आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांवर पोलिसांकडून झालेल्या कारवाईनंतर सुषमा अंधारे यांनी प्रशासनासह सरकारवर ताशेरे ओढले आहेत.काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
Sushma Andhare: परभणीत काल संध्याकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरु असल्याचं समजते. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलाय. मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेला नाही. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावा आणि कुणी हाताळावा, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.अशा परिस्थितीत कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांचे आयुष्य आणि भविष्य उद्धस्त करण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून चालू असेल तर हे निंदनीय असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांनंतर परभणीत आज परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान, आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांवर पोलिसांकडून झालेल्या कारवाईनंतर सुषमा अंधारे यांनी प्रशासनासह सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
परभणीमध्ये काल संध्याकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचे समजते. मुळात 20 तारखेला निवडणुकांचे निकाल लागले. 23-24 तारखेला काळजीवाहक मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यानंतरपासून ते आत्तापर्यंत दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेला नाही. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावा आणि कुणी हाताळावा, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
परभणी हा अत्यंत संवेदनशील एरिया आहे. सगळ्या आंबेडकरी चळवळीतील पॅंथरांचे निवासस्थान परभणीत आहे. अशी परिस्थिती असताना, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती उध्वस्त केली जात आहे. त्याची प्रतिक्रिया येणे अत्यंत सहज आणि स्वाभाविक आहे. म्हणून आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी जो बंद पुकारला होता, अशा परिस्थितीत आवश्यक असणारी पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून केली जाणे अपेक्षित होते. व्यापारपेठेला तशी कल्पना देणेही अपेक्षित होते. परंतु, जेव्हा ती घटना घडली नाही किंवा त्या बंदला प्रतिसाद संविष्ट स्वरूपाचा मिळाला नाही, आणि काही लोकांनी त्यांची दुकाने चालू ठेवली, त्यावेळी संतप्त आंबेडकरी अनुयायांनी काही दुकाने बंद करण्यासाठी जी पावले उचलली, त्याचे समर्थन करता येत नाही. परंतु, अशा घटना घडण्याला कारणीभूत हे येथील पोलीस व्यवस्था आहे. इथला गृहखाता आहे. मात्र गृहखाते असे का वागत आहे? कारण गृहखात्याला कोणी निर्देश देणारा मंत्रीच अस्तित्वात नाही, तर करायचे काय? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला.
आंबेडकरी अनुयायांचे आयुष्य उध्वस्त..
अशा परिस्थितीत, कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांचे आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल, तर निश्चितपणे हा अत्यंत निंदनीय आणि निषिद्ध प्रकार आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्याऐवजी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अशा पिढ्या उध्वस्त करणे आणि बर्बाद करणे, याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. असेही त्या म्हणाल्या.