Sharad Pawar: शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
Ajit Pawar Meet Sharad Pawar: आज झालेल्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग आला आहे. या भेटीनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या भेटीनंतर रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिनाच्या दिवशी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी पवार कुटूंबासोबत राष्ट्रवादीतील बडे नेते देखील उपस्थित होते. आज अजित पवार, सुनेत्रा पवार, जय पवार, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ हे नेते शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते. गेल्या वर्षी फूट पडली त्यानंतर शरद पवार यांचा वाढदिवस झाला होता, तेव्हा अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळी शरद पवारांना भेटणं टाळलं होतं. अशातच आज झालेल्या या भेटीनंतर घडामोडींना वेग आला आहे. या भेटीनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. या भेटीनंतर रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार शरद पवार भेटीवर युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार म्हणाले, अजित पवार भेटीसाठी येणार होते हे मला माहिती नव्हतं आणि आमच्या कुटुंबाने नेहमी कौटुंबिक संबंध हे वेगळे ठेवले आहेत. ते शेवटी साहेब आहेत. आज त्यांचा 85 वा वाढदिवस आहे. त्यांना जाऊन भेटलं पाहिजे त्या भावनेने अजित पवार आले असतील, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाचे जेष्ठ नेते होते ते आता अजित पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते वाढदिवसासाठी भेटण्यासाठी आले असावेत असेही युगेंद्र पवार यावेळी बोलताना म्हणाले.
निवडणुका झाल्या, त्यामध्ये आम्ही आमची पातळी सोडली नाही, आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असला पाहिजे. आपले विचार हे वेगळे असले पाहिजेत. विचार आता वेगळे झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आले पाहिजे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. असा एक आपला प्रयत्न असेल असंही युगेंद्र पवार पुढे म्हणाले आहेत.
आजची भेट ही शंभर टक्के कौटुंबिक आहे. बाकी काहीही नाही असे त्यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केला आहे. अजित पवार यांच्यासोबत आलेले त्यांच्या पक्षाचे नेते हे काही मंत्री होणार आहेत, काही खासदार आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर ठेवून फक्त कुटूंबाने भेटणं हे पण बरोबर नाही. त्यांना बाहेर थांबून ठेवणं योग्य नाही. त्यामुळे सर्वजण शरद पवारांना भेटण्यासाठी गेले होते. अजित पवार सुनेत्रा पवार त्याचबरोबर पक्षाचे काही ठराविक नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासोबत अनेक नेते होते अशी माहिती यावेळी युगेंद्र पवार यांनी दिली आहे.
युगेंद्र पवार म्हणतात, आता पाडवा एकत्रच?
पुर्वीपासून आमचं पवार कुटूंब असंच आहे. आम्ही भेटत असतो. आधीही वेगवेगळ्या विचारांचे लोक आमच्या कुटुंबात होती ते देखील प्रत्येक कार्यक्रमाला समारंभाला वाढदिवसाला एकत्रित येत होती. आताही एकत्रित येत आहेत. आम्ही आत्तापर्यंत राजकारण एकाच बाजूला ठेवत आलोय आणि कौटुंबिक संबंध हे एका बाजूला असले पाहिजेत. हा वारसा ही परंपरा शारदाबाई पवार यांनी सुरू केलेले आहे त्याचप्रमाणे आपण आम्ही सर्वजण पुढे जात आहे. यावर्षी निवडणुका आणि दिवाळी पाडवा एकत्र आले त्यामुळे त्यांनी वेगळा पाडवा घ्यायचा निर्णय घेतला असेल. पण, पुढच्या वर्षी एखाद्या वेळी पाडवा आम्ही एकत्रित घेऊ असं मोठं वक्तव्य युगेंद्र पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.
अजित पवार शरद पवार भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित दादा आले त्यांच्यासोबत अनेक नेते आले ही चांगली गोष्ट आहे. शेवटी हीच तर आपली संस्कृती आहे आणि ती जपली पाहिजे. ते जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्व मोठे नेते अशा प्रकारे जर संस्कृती जपत असतील तर चांगली गोष्ट आहे. आमच्यासारख्या नवीन आमदारांना नवीन राजकारणामध्ये आलेल्यांना जेव्हा आधीची पिढी संस्कृती जपते हे बघताना आम्हाला नक्कीच आवडतात असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. राजकारणात चाललेल्या अनेक चर्चांवर बोलताना रोहित पवार म्हणाले, कधी-कधी फक्त एखादा नेता भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा इतकं म्हणून जरी बाहेर आला तरी बाहेर चर्चा सुरू होते. त्यामध्ये काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपली संस्कृती जपणं हे महत्त्वाचं आहे असं रोहित पवार यांनी पुढे म्हटलं आहे.
कुटुंब सोडून इतरही नेते उपस्थित होते, त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, ही चांगली गोष्ट आहे. शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये अनेक जण बऱ्याच काही गोष्टी बोलून जातात. निवडणुकीच्या काळात अनेक आरोप प्रत्यारोप होतात. पण आज वाढदिवसानिमित्त ते शरद पवारांना भेटले, शुभेच्छा दिल्या. ही चांगली गोष्ट आहे असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर विकासाचा राजकारण असावं. त्यामुळे फक्त टीका होत असते कोणाचं भलं होत नसतं. आज सकारात्मक राजकारण पाहायला मिळते आमच्यासारख्या नेत्यांसाठी चांगली गोष्ट आहे असंही रोहित पवारांनी पुढे म्हटलं आहे.