Sanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाही
Sanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाही
गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार हा काका-पुतण्यातील वाद अखेर संपण्याची चिन्हे दिसत आहेत. शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त अजित पवार हे गुरुवारी सकाळी सहकुटुंब पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी पोहोचले आहेत. ते आता शरद पवार यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात निकराची लढाई केल्यानंतर दिल्लीतील शरद पवार आणि अजित पवार यांची ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एकीकडे या भेटीमुळे पवार वाद संपल्याची चर्चा सुरु झाली असताना या भेटीचा आणखी एक अर्थ काढला जात आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन भाजप नेतृत्त्वाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. याविषयी बोलताना 'एबीपी माझा'च्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील पराभवातून अजित पवार यांनी धडा घेतला होता. त्यामुळेच अजित पवार यांनी लोकसभेला आपण सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभे करुन चूक केल्याची कबुली दिली. त्यानंतर अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणेही टाळले होते. त्यानंतर आता अजित पवार सगळे वाद विसरुन शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाचे खासदार हे अजितदादांच्या गटात प्रवेश करुन महायुतीसोबत जाणार, अशी चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे, असे सरिता कौशिक यांनी सांगितले.