Praful Patel : 'देशात सगळ्यात जास्त कंजूष अर्थमंत्री अजित पवार...', प्रफुल पटेलांचं वक्तव्य अन् उपस्थितामध्ये हशा, नेमकं काय घडलं?
Praful Patel : प्रफुल पटेल यांनी बोलताना भारतात सगळ्या जास्त कंजूष अर्थमंत्री कोण असेल तर ते अजित पवार आहेत असं म्हणत अजित पवारांचं कौतुक केलं आहे.
नागपूर: आज नागपुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडत आहे. यावेळी कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी बोलताना भारतात सगळ्या जास्त कंजूष अर्थमंत्री कोण असेल तर ते अजित पवार आहेत असं म्हणत अजित पवारांचं कौतुक केलं आहे.
नेमकं काय म्हणाले प्रफुल पटेल?
प्रफुल पटेल मेळाव्यावेळी बोलताना ते म्हणाले, 'लोकसभेनंतर लोकांना असं वाटलं की, विधानसभेमध्ये राष्ट्रवादी संपली. दहा, पंधरा किंवा वीस जागा येतील 20 तर फारच झाल्या. 15 जागांच्यावर जागा येतील असं वाटत नव्हतं. आपल्या अजित पवार यांनी खूप मेहनत केली. आपल्या पक्षाचं जे गुलाबी-गुलाबी वातावरण दिसून आलं. हे आपल्या एक वेगळेपण ठरलं. आपली एक वेगळी ओळख ठरली.आपली ओळख फक्त फेट्याच्या मार्फत नाही, आपण केलेल्या कामाच्या मार्फत देखील दिसून आली. खऱ्या अर्थाने आज लाडकी बहीण योजना यामुळे आज आपल्याला हा यशाचा दिवस साजरा करता येत आहे. त्याच्यामागे अजित पवार यांचा मोठा योगदान होतं आणि या राज्यामध्ये या योजनेवरून विरोधक म्हणत होते, एक दोन महिन्यात ही योजना बंद पडेल. इलेक्शन झाल्यावर पैसे मिळणार नाहीत किंवा इलेक्शन पुरती ही योजना राबवली आहे. मात्र, योजना यशस्वी रीतीने राबवली गेली यामध्ये अदिती तटकरे यांनी देखील मोठी मेहनत घेतली. ही योजना यशस्वीरित्या राबवून दाखवली आणि पाच महिन्यांचे पैसे जवळपास अडीच करोड रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले',असंही ते पुढे म्हणाले.
भारतामध्ये सर्वात कंजूस अर्थमंत्री असेल तर तो अजितदादा
पुढे ते म्हणाले, 'आम्ही प्रचारासाठी गेलो तेव्हा आम्ही महिला भगिनींना विचारलं, तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का? तेव्हा सर्व बहीणी हात वर करायच्या. शेतकऱ्यांचा विज बिल माफ करून पुढचं बिल झिरो करण्याची भूमिका देखील यात सरकारने राबवली. अनेक योजना महाराष्ट्रात या सरकारने आणल्या. सगळे म्हणायचे तिजोऱ्या खाली आहेत. पैसे नाहीयेत पैसे कुठून आणणार अनेक लोक दिल्लीत देखील हे प्रश्न उपस्थित करायचे. गावात देखील अनेक पत्रकार याबाबत प्रश्न विचारायचे, मी तुम्हाला सांगतो अख्ख्या भारतामध्ये जर कोण सर्वात कंजूस अर्थमंत्री असेल तर तो अजितदादा आहे,' असं यावेळी बोलताना खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.
प्रफुल पटेल यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, कंजूस म्हणजे चांगल्या भावनेने, अजित दादा पैसे वाया जाऊ देणार नाही. जो पैसा जिथे पोहोचला पाहिजे तिथे पोहोचेल. पण, कधीही महाराष्ट्रावर कोणी डोळा टाकला तर हात त्याला हात लावू देणार नाही, असा यशस्वी अर्थमंत्री म्हणजे अजित पवार आहेत, त्यामुळे कोणी काही चिंता करू नये, असं पुढे प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी सर्वांना धीर आणि आणि ताकद देण्याचं काम अजित दादांनी केलं आहे. त्यामुळेच आज आपल्याला हा विजयाचा दिवस पाहायला मिळतो आहे, असेही पुढे पटेल यांनी म्हटलं आहे.