Thane Lok Sabha Election 2024: महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला, मुख्यमंत्र्याचा हुकुमी एक्का नरेश म्हस्के रिंगणात
Naresh Mhaske: ठाणे लोकसभा नरेश म्हस्के लढवणार आहे. या संदर्कात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे आहे.
ठाणे : महायुतीत (Mahayuti) ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून अधिकृत उमेदवारी (Thane Lok Sabha Election) जाहीर करण्यात येणार आहे. काल झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.
ठाणे लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अंतीम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. या वेळी मुख्यमंत्र्याच्या घरी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली . यानंतर उमेदवार निवडण्याचा सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. उमेदवार कोणी असो सर्व ताकद लावली जाणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी दिले , त्यानंतर नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणूक - २०२४ साठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्री. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून श्री. नरेश गणपत म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena #LokasabhaElection2024 pic.twitter.com/XYJjTUy0r8
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) May 1, 2024
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली होती. तरी अद्याप महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नव्हती त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतला नव्हता. उद्या अर्ज भरणार आहे.
ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश
ठाणे लोकसभेसाठी अनेक नावांची चर्चा सुरुवातीपासून होत आहे. प्रताप सरनाईक, मिनाक्षी शिंदे अशी अनेक नावे समोर आली आहे. भाजपकडून देखील संजय केळकरांचे नाव चर्चेत होते. या जागेसाठी एकनाथ शिंदेंनी अनेक बैठका घेतल्या. अखेर ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश मिळाले आहे. भाजपचा आग्रह मोडत एकनाथ शिंदेंनी ही जागा आपल्याकडे ठेवली आहे.
नगरसेवक ते खासदारकीचे तिकीट
नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेंना पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला होता. शिवसेनेतून सर्वात पहिली हकालपट्टी ही नरेश म्हस्केंची करण्यात आली होती.त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेचे फळ एकनाथ शिंदेंनी दिले आहे. नरेश म्हस्के हे गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर ते सभागृह नेता होते. ते ठाण्याचे महापौर देखील होते.
Video: