(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
Thane Loksabha 2024: ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आला आहे.
Thane Loksabha 2024: ठाणे: राज्यातील लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातील मतदान पार पडले तरी महायुतीमधील जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर या जागांवर अद्याप महायुतीने उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. मात्र ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना लोकसभेसाठी ठाण्यातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याचं समोर आलं आहे. प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, मीनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यामध्ये चुरस होती. यामध्ये नरेश म्हस्के यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज किंवा उद्या याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. नरेश म्हस्के हे श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पडद्यामागील हालचालींमध्ये नरेश म्हस्केंचा मोठा वाटा असतो.
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी अद्याप महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आज राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतला नसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे महायुतीचा उमेदवार नक्की कधी जाहीर होणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ठाणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्रचाराचा धुरळा उडताना दिसत असल्याने महायुतीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा, अशी मागणीही स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे.
ठाण्यातील महायुतीची ताकद...
ठाणे लोकसभेची ताकद पाहिल्यास मंदा म्हात्रे, गणेश नाईक आणि संजय केळकर हे भाजपचे तीन आमदार आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आमदार आहेत. तर गीता जैन या अपक्ष आमदार आहेत. तसेच, शिंदे यांचा गड म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो.
हेमंत गोडसेंकडून देवदर्शनाचा धडाका
नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईवारी करणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांचा देवदर्शनाचा धडका सुरूच आहे. अयोध्येतील राम मंदिर पाठोपाठ हेमंत गोडसे यांनी तुळजापूरला जाऊन भवानी मातेचे दर्शन घेतले. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी पहिल्याच दिवशी हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला आहे. तोच अर्ज देवीच्या चरणावर ठेऊन हेमंत गोडसे यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. तिकीट मिळविण्यासाठी दोन महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या हेमंत गोडसेना भवानी माता पावणार का, याकडे लक्ष लागले आहे.