Buldhana Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार जाहीर
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात (Buldhana Lok Sabha Election 2024) शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना लोकसभेचे तिकीट दिलं जाणार आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray) लोकसभा निवडणुकीसाठी आपला आणखी एक उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाकडून ईशान्य मुंबईतून (North-East Mumbai Constituency) माजी खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांना नोव्हेंबर महिन्यात उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाने आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात (Buldhana Lok Sabha Election 2024) शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांना लोकसभेचे तिकीट दिलं जाणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 21 आणि 22 फेब्रुवारीला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते नरेंद्र खेडेकर यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा करतील.
मातोश्रीवरील बैठकीत निर्णय
मातोश्रीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची बैठक आज पार पडली, या बैठकीमध्ये संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी मध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे असणार आहे.
नरेंद्र खेडेकर यांच्या नावाला पसंती
या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे उभे राहतील . नरेंद्र खेडेकर हे या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख हे आता सध्या बुलढाणा मध्ये जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत आहेत .त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.
या लोकसभा मतदारसंघांमध्ये बुलढाणा, चिखली,खामगाव, सिंदखेडराजा, मेहेकर, जळगाव जामोद हे विधानसभा क्षेत्र येतात.
प्रतापराव जाधव यांचा पराभव करण्याचा निर्धार
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीही बुलढाणा लोकसभेचा आढावा घेतला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. माझ्यासोबत राहिलेल्या निष्ठावंतांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी यापूर्वी झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिला होता.
संबंधित बातम्या
ठाकरेंकडून बुलढाणा-अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा, बैठकीमध्ये नेमकी काय झाली चर्चा ?
ईशान्य मुंबईसाठी ठाकरेंचा नवा शिलेदार मैदानात, माजी खासदार संजय पाटलांना उमेदवारी जाहीर