मी शारदाबाई पवारांची नात; सुप्रिया सुळेंचा दादा-वहिनींना टोला, धंगेकरांसाठी खास घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुणे - राज्यातील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढाईत आज अनेक शिलेदार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळेच, पुण्यात सभांचा धडाका लागल्याचं दिसून येत असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नामनिर्देशानंतर सभेत अनेक नेत्यांची भाषणं झाली. खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून नाव न घेता महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केलं. केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत, फोडाफोडीचं राजकारण होत असल्याचेही कोल्हेंनी म्हटले. तर, खासदार सुप्रिया सुळेंनीही आपल्या भाषणातून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, पवार कुटुंबातील बारामती मतदारसंघाच्या लढतीवर भाष्य करताना भावजय सुनेत्रा पवारांना टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, आयोजित सभेतून त्यांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच, विजयाचा विश्वासही व्यक्त केला. दुसरीकडे पुण्यात महाविकास आघाडीतील शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याचे रविंद्र धंगेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर, आयोजित सभेत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंची तोफ धडाडल्याचं दिसून आलं. बारामतीतील विकास मीच केलाय, म्हणणाऱ्या अजित पवारांना कार्य अहवाल पाठवणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तर, मी शारदाबाई पवारांची नात असल्याचे सांगत दादा-वहिनींना टोलाही लगावला.
मी दहा वर्षे निधी आणला नाही, त्यांना माझा कार्य अहवाल मी चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे. तो अहवाल मराठीतही आहे, असा टोलाही अजित पवारांना लगावला. तसेच, त्यांनी माझा कार्य अहवाल वाचला तर ते मलाचं मतदान करतील. (कार्य अहवाल वाचून अजित पवारांचं कुटुंब मला चं मतदान करेल, असं सूचित केलं). तसेच, मला म्हणतात हे रडत बसतील. पण, लक्षात ठेवा, शारदाबाई पवारांची नात आहे मी, रडत बसणारी नाही. मला लढायला शिकवलं आहे, रडायला नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी दादा वहिनींना टोला लगावला.
रामकृष्ण हरी अन् वाजवा तुतारी
मी नशिबवान आहे, मला तुतारी हे चिन्ह मिळालं. तुतारी सर्व शुभकार्यासाठी असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारीच वाजली होती. आपल्याला ही तुतारी रविंद्र धंगेकर यांच्याहाती द्यायची आहे. शाहू-फुले-आंबेडकर, जितेगा धंगेकर.. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली. आमच्या एका हातात तुतारी आणि दुसऱ्या हाती मशाल आहे. रामकृष्ण हरी अन् वाजवा तुतारी.. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली.
मोदी फक्त गोलगोल फिरवतात
मोदी भारताची अर्थ व्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे, असं म्हणतात. मात्र, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती जशी होती, तशीच कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर असतो. हे मी नव्हे तर देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. तसेच, विकसित भारत हे स्वप्न 2047 पर्यंत शक्य नाही. याला मोदींची धोरणं कारणीभूत ठरली आहेत. मोदी फक्त गोलगोल फिरवतात. मात्र, विकासाची व्याख्या सांगत नाहीत. मोदी फक्त फोटो झळकवतात. 48 ठिकाणी त्यांचे फोटो झळकवले आहेत. त्यांना भीती आहे, आपला फोटो जनतेसमोर नसेल तर जनता आपल्याला विसरून जातील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
अमोल कोल्हेंनी काय म्हटलं
कोट्यवधींना मोफत खाती उघडून दिली, नंतर त्या खात्यात दोन हजार रुपये रक्कम ठेवावीच लागेल असा नियम आणला. मग या खात्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला लावलं. हे करण्यासाठी दोनशे रुपये फी आकारली, उशीर झाला तर दंडही आकारला. मग हा निधी फोडाफोडी अन निवडणुकीसाठीचा पैसा म्हणून वापरला जातोय, अशी टीका अमोल कोल्हे यांनी भाजपावर केली.