ऊस दराची स्पर्धा ठरवणार माढा विधानसभेचा आमदार? दिग्गज साखर कारखानदार आमने-सामने, काय आहेत समीकरणं?
राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून माढा मतदारसंघाकडं (Madha Vidhansabha) पाहिलं जात आहे. आता माढ्याची लढाई ऊसाच्या दरावर (Sugarcane Price) येऊन पोहोचणार असे चित्र दिसत आहे.
Madha Vidhansabha Election : राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून माढा मतदारसंघाकडं (Madha Vidhansabha) पाहिलं जात आहे. आता माढ्याची लढाई ऊसाच्या दरावर (Sugarcane Price) येऊन पोहोचणार असे चित्र दिसत आहे. कारण, सोलापूर (Solapur) जिल्हा हा साखर कारखानदारांचा जिल्हा अशी ओळख आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही ऊस दराच्या दिशेने जाऊ लागली असून आमदार बबनदादा शिंदे (Mla babandada shinde) यांचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना या दोघांमध्ये दराची स्पर्धा विधानसभेचा आमदार ठरवणार असे चित्र दिसत आहे.
अभिजीत पाटलांनी ऊसाला 3500 रुपयांचा दर केला जाहीर
अभिजीत पाटील यांनी गेल्या वेळेला दोन वर्ष बंद असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू करून तब्बल 10 लाख 81 हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप केले होते. यावेळीही त्यांनी शरद पवार यांच्यासमोर सर्वाधिक दर देण्याची घोषणा करत 3000 रुपये प्रति टन एवढा उसाचा दर दिला होता. यानंतर सर्वच साखर कारखान्यांना अभिजीत पाटील यांच्या दराच्या जवळपास जावे लागले आणि याचा फायदा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला होता. यावर्षी अभिजीत पाटील हे माढा विधानसभेतून निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी या वर्षीचा दर 3500 रुपये जाहीर करत मोठी आघाडी घेतल्याने इतर कारखानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत.
माढ्याची निवडणूक ऊस दराकडे झुकू लागली
माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे माढा तालुक्यातील सर्वात मोठे साखर सम्राट अशी ओळख असलेले नेते असून त्यांच्याकडे राज्यात सर्वाधिक गाळप करणारा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आहे. याशिवाय मोहिते पाटील यांच्याकडून घेऊन विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा भाग दोन बनवलेला विजय शुगर असे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. यातील विठ्ठलराव शिंदे हा कारखाना सर्वाधिक गाळप करत असल्याने गेल्या वर्षी जवळपास 25 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप शिंदे केले होते. तर पंढरपूरच्या अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातून 10 लाख 81 हजार टन गाळप करीत तीन हजार रुपये भाव दिला होता. आता यावर्षी अभिजीत पाटील यांनी थेट साडेतीन हजाराचा भाव जाहीर केल्याने सर्वात मोठी कोंडी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांची झाली आहे. अभिजीत पाटील यांनी साडेतीन हजार रुपये भाव जाहीर केल्यानंतर त्यांना मिळू लागलेला प्रतिसाद पाहून आमदार शिंदे यांनी अभिजीत पाटील यांच्या पेक्षा एक रुपया जास्त दर देण्याची घोषणा केली. आता शांत बसतील ते अभिजीत पाटील कसले त्यांनी लगेच विठ्ठल च्या सर्वसाधारण सभेत जर दुसऱ्यांनी एक रुपया जास्त दिला तर मी दोन रुपये जास्त देईन पण सर्वात जास्त दर हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा असेल अशी घोषणा केल्याने आता माढ्याची निवडणूक ही ऊस दराकडे झुकू लागली आहे.
15 नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरु होणार
यंदा ऊस कमी असून कारखानेही जवळपास एक महिना उशिरा सुरू होत असल्याने उसाची रिकवरी किमान एक टक्का पर्यंत वाढणार आहे. हेच गणित डोक्यात ठेवून अभिजीत पाटील यांनी यंदा साडेतीन हजार रुपये एवढा भाव जाहीर केला आहे. गेल्या वर्षी मी तीन हजार रुपये एवढा भाव देऊ शकलो होतो. गेल्या वर्षीचा हंगाम 20 ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता. मात्र यंदा सुरू असलेला पाऊस आणि विधानसभा निवडणूक यामुळे यंदाचा हंगाम हा जवळपास एक महिना उशिरा म्हणजे 15 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. एक महिना उशीर झाल्याने उसाची रिकवरी एक टक्का वाढली तरी जास्तीचे 360 रुपये मिळू शकणार आहेत. याशिवाय एम एस पी वाढवण्याच्या हालचाली जोरदार सुरू झाले असून ही एमएसपी आता 3900 पर्यंत जाऊ शकणार आहे. त्यामुळं साखर पोत्याचा दर वाढल्यास उरलेले 140 रुपये वाढवून देणे माझ्यासाठी अजिबात अवघड नसल्याचे गणित अभिजीत पाटील म्हणतात. आपण विठ्ठल सहकारी साखर कारखाना जिंकण्यापूर्वी जिल्ह्यातील दर हे 2200 ते 2400 च्या दरम्यान होते. मात्र आपण कारखाना जिंकल्यावर गेल्यावर्षी थेट 3000 रुपये एवढा दर दिल्याने शेतकऱ्यांना जवळपास दीडशे कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे इतर कारखान्यांना द्यावे लागले होते. आता मी साडेतीन हजार रुपये एवढा दर जाहीर केल्यानंतर आमदार शिंदे यांनीही एक रुपया जास्त देण्याची जी घोषणा केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना नुसत्या शिंदेंच्या कारखान्याकडून जवळपास 75 कोटी रुपये जास्तीचे मिळू शकणार असल्याचा दावा अभिजीत पाटील यांनी केला आहे.
दोन दिग्गज साखर कारखानदार यंदा विधानसभेला आमने-सामने
माढ्यामध्ये हे दोन दिग्गज साखर कारखानदार यंदा विधानसभेला आमने-सामने येत असताना इतर इच्छुकांनी मात्र आम्हाला आमदार म्हणून साखर कारखानदार नको अशी भूमिका घेत अभिजीत पाटील आणि शिंदे या दोघांनाही विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या माढा विधानसभेत आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे, विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका मीनल ताई साठे या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे या सर्वांनी शरद पवारांच्या तुतारीकडे आपले प्रयत्न सुरू केले असल्याने यंदाचा चेअरमन साखर कारखानदार होणार आणि या निवडणुकीत साखरेचा दर हाच प्रचाराचा मोठा मुद्दा ठरणार हे जवळपास निश्चित होताना दिसत आहे.
शरद पवार यांच्यासमोर कोणती नावे?
सध्या माढा विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक असले तरी शरद पवार यांच्यासमोर विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे, अभिजीत पाटील आणि रणजीत सिंह मोहिते पाटील ही तीन प्रमुख नावे स्पर्धेत आहेत. काल झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आम्हाला अकलूज किंवा पंढरपूरचा आमदार नको आणि बबनराव शिंदे यांना पक्ष प्रवेश नको अशी भूमिका इतर इच्छुकांनी उघडपणे घेतल्याने पवारांना याही गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. असे असले तरी माढा मतदारसंघात निर्णय ठरवण्याची ताकद ऊस उत्पादक शेतकरी वर्गात असल्याने शरद पवार यांच्यासमोर सध्या रणजीत शिंदे आणि अभिजीत पाटील या दोघातील उमेदवार विधानसभेला निवडणे हाच सर्वात मोठा पर्याय आहे. यातील कोणताही उमेदवार निवडला तरी विधानसभेच्या प्रचारात यंदा जाहीर केलेला उसाचा दर हा सर्वात प्रमुख मुद्दा ठरणार असून अभिजीत पाटलांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील इतर मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या साखर कारखानदार उमेदवारांनाही याच दराच्या जवळपास जावे लागणार आहे. अभिजीत पाटील यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळणार असून सोलापूर जिल्ह्याचा उसाचा दरही आता कोल्हापूरच्या स्पर्धेपर्यंत जाऊ शकणार आहे.
महत्वाच्या बातम्या: