नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव (Shyam Manav) यांच्या "संविधान बचाव महाराष्ट्र बचाव" सभेमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली.
Shyam Manav Nagpur News : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव (Shyam Manav) यांच्या "संविधान बचाव महाराष्ट्र बचाव" सभेमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) कार्यकर्त्यांनी जाब विचारत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडलीय. श्याम मानव यांचं व्याख्यान सुरु होण्याच्या आधी दुसरे वक्ते दशरथ मडावी बोलत होते. यावेळी हा प्रकार घडला. नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर माहिता पाहुयात.
नेमकं काय घडलं?
दशरथ मडावी यांनी बोलताना 2014 नंतर संविधान धोक्यात आल्याचा वारंवार उल्लेख केले. तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून 2014 नंतरच संविधान कसं काय धोक्यात आलं? हे सांगा असा प्रश्न विचारला. या प्रश्नानंतरही दशरथ मडावी यांनी आपला भाषण सुरूच ठेवला आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते घोषणाबाजी देत व्यासपीठाच्या दिशेने चालत गेले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना व्यासपीठाच्या पायऱ्यांजवळ अडवले. पोलीसही त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अडवलं. त्याच वेळेस व्यासपीठाच्या पाठीमागे सभेसंदर्भात लावण्यात आलेला बॅनर एका तरुणाने फाडला. श्याम मानव यांना लगेच व्यासपीठावरील इतर व्यक्ती आणि श्याम मानव यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सुरक्षा देत व्यासपीठावर बसवून ठेवलं. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते व्यासपीठांसमोर जोरदार घोषणाबाजी करत असताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत भाजायूमोच्या कार्यकर्त्यांना सभागृहाचे बाहेर काढले आणि ताब्यात घेतले.
श्याम मानव यांच्या सभेत काँग्रेससाठी पाठिंबा मागितला जात असल्याचा भाजयुमोचा आरोप
आम्ही फक्त प्रश्न विचारला, त्याचं उत्तर दिलं गेलं नाही, म्हणून आम्ही घोषणाबाजी केल्याची माहिती भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. श्याम मानव यांच्या सभेत कुठेही अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भातले मुद्दे न सांगता काँग्रेससाठी पाठिंबा मागितला जात आहे असा भाजयुमो कार्यकर्त्यांचा आरोप होता. एवढंच नाही तर काही पक्षांच्या फंडिंगवरही सभा आयोजित केली जात आहे असा आरोपही भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. दरम्यान व्यासपीठावरील बॅनर आम्ही फाडलेला नाही, तो श्याम मानव यांच्या कार्यकर्त्यांनीच फाडला आहे. कारण, बॅनरवरील राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख ही सभा राजकीय दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आली असं सांगणारा होता. हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी बॅनर फाडलं असा प्रतिवाद भाजायुमोच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Shyam Manav: राज्यातील आत्ताचे पोलीसखातं हे केवळ मालकाच्या इशाऱ्यावर वागतंय; अनिसच्या डॉ. श्याम मानव यांची टीका