(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dada Bhuse: मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, हे बोलणं योग्य नाही; भुजबळांचं वक्तव्य शिवसेनेला झोंबलं
Maharashtra Politics: शरद पवार आणि छगन भुजबळांची मुंबईत भेट. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा. मुख्यमंत्र्यांना आरक्षणातील कळत नाही, असे भुजबळ म्हणत असतील तर ते बोलणे योग्य नाही.
नाशिक: छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांना राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यसाठी लक्ष घालण्याची विनंती केली. तुम्ही राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहात. त्यामुळे इतर कोणापेक्षाही तुम्हालाच महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीची सूक्ष्म जाण आहे, असे भुजबळ यांनी म्हटले. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षा शरद पवार (Sharad Pawar) यांचे स्थान महत्त्वाचे असल्याचा एकप्रकारचा मेसेज गेला होता. हीच गोष्ट शिंदे गटाला खटकली आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सोमवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले.
शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची भेट घेतली तर चुकीचे नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांना आरक्षणातील कळत नाही, असे भुजबळ म्हणत असतील तर ते बोलणे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका दादा भुसे यांनी मांडली. आता नोकर भरतीमध्ये आरक्षणाचा विचार होतो. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना कळते. आता मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विधिमंडळात एकमताने निर्णय झाला तरीही काहीजण मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न करत आहेत, असे दादा भुसे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणासंदर्भात कधीही गोलमोल भूमिका घेतलेली नाही. त्यांनी नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली आहे. गोरगरीबांना आरक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्री काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही मराठा आरक्षणाबाबत काम झाले. पण त्या काळात मराठा आरक्षण कोर्टात टिकले नाही. आताही 10 टक्के आरक्षणासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे दादा भुसे यांनी सांगितले.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीला तुम्ही यायला पाहिजे होते, असे छगन भुजबळ यांनी सोमवारच्या बैठकीत शरद पवार यांना सांगितले. तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नेते आहात. प्रत्येक गावात आणि जिल्ह्यात समाज घटकांची नेमकी काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री झालो किंवा मुख्यमंत्री झालो म्हणजे आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही. गावगाड्यातील सामाजिक परिस्थितीचा तुमचा अभ्यास आमच्यापेक्षा जास्त आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
आणखी वाचा
शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ वेटिंगवर, भेट घेऊनच परतणार, भुजबळांचा पवित्रा