मोठी बातमी : पूर्व विदर्भ जिंकण्यासाठी भास्कर जाधवांचा खास प्लॅन, मविआमध्ये शिवसेनाच नंबर वन असल्याची आठवण!
पूर्व विदर्भात 28 पैकी 14 जागा शिवसेना ठाकरे गटाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लढण्याची संधी असून विदर्भात पुन्हा एकदा शिवसेनेला वैभव प्राप्त करून देण्याची ही संधी आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता राजकीय पक्षांनी विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. शिवसेना पक्षाच्या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना व प्रमुख नेत्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे आषाढी वारी हा महाराष्ट्राचा मोठा उत्सव आहे. या उत्सवात सहभागी व्हा, प्रत्येक तालुक्यात वारकऱ्यांच्या दिंडीचे स्वागत करा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे पक्षाकडूनही विधानसभेची तयारी सुरू असून विदर्भात (Vidarbha) शिवसेनेनं चाचपणी केल्याचं दिसून येतं. शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पूर्व विदर्भाचा दौरा करुन तब्बल 50 टक्के जागांवर दावा केला आहे.
पूर्व विदर्भात 28 पैकी 14 जागा शिवसेना ठाकरे गटाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लढण्याची संधी असून विदर्भात पुन्हा एकदा शिवसेनेला वैभव प्राप्त करून देण्याची ही संधी आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. विधानसभेच्या निवडणुकीला शंभर दिवसांपेक्षा कमी दिवस राहिले आहेत, त्यासाठी काही गोष्टींचा होमवर्क केला पाहिजे. पूर्व विदर्भाचा विभागीय नेता म्हणून माझ्यावर काही जबाबदारी आहे. माझ्यावरील ही जबाबदारी पार पाडण्यासाठी मी विदर्भात तीन दिवस होतो. भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला विधानसभेसाठी मोठी संधी मिळाल्याचं त्यांनी म्हटलं.
28 पैकी 14 जागांवर दावा
पूर्व विदर्भात विधानसभेच्या एकूण 28 जागा आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसचे 12 ते 14 उमेदवार येथे निवडून आले आहेत. तर, पूर्व विदर्भात शिवसेना ठाकरे गटाला 14 जागांवर निवडणूक लढवण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे, आता पूर्व विदर्भातील 14 जागांचा आढावा घेऊ आणि संभाव्य उमेदवारांसंदर्भात चर्चा करू, याशिवाय ते निवडून येतील का त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल, असे म्हणत भास्कर जाधव यांनी पूर्व विदर्भात शिवसेनेसाठी खास प्लॅन आखला आहे.
तुझी जागा-माझा जागा करणे योग्य नाही
1990 सालापासूनचा विचार केल्यास शिवसेना भाजप युतीमध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष म्हणून मोठा पक्ष होता. पण भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे आमचा एक एक उमेदवार पाडण्यात आला. त्यांच्या या विश्वासघातकीपणामुळे भाजपने शिवसेनेला 'कट टू साईज' केलं. भाजपने शिवसेनेची ताकद कमी केली, पण आता पुन्हा एकदा शिवसेनेला गत वैभव प्राप्त करून देणार आहोत, असे जाधव यांनी म्हटले. तसेच, महाविकास आघाडीत काही गोंधळ होणार नाही भरपूर स्कोप आहे आघाडीतील 3 पक्ष मुख्य आहेत, 288 जागा आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीची सत्ता आणणे हे उद्दिष्ट ठेवावे लागेल, तुझी जागा माझी जागा करणे योग्य नाही. अतिशय व्यवस्थितपणे जागावाटप होईल, असे म्हणत जागावाटपावरही भास्कर जाधव यांनी भाष्य केले.
शिवसेना हाच मोठा भाऊ
दरम्यान, 2019 मध्ये महाविकास आघाडीत एक नंबरचा पक्ष हा शिवसेना होता, याचं पुन्हा एकदा मी स्मरण करून देतो, असे म्हणत महाविकास आघाडीत शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा दावाही भास्कर जाधव यांनी केला आहे.