Prakash Ambedkar: उद्धव ठाकरेंची 'ती' गोष्ट खटकली, प्रकाश आंबेडकर संतापून म्हणाले, दलित-बौद्धांनो आतातरी शहाणे व्हा!
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीत राज्यातील 9 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले होते. मुंबईत ठाकरे गटाला मिळालेले यश पक्षाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील 48 पैकी 30 जागा जिंकत महायुतीला दणका दिला होता. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी चार जागाही महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. यामध्ये ठाकरे गटाच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. मुंबईत ठाकरे गटाला मिळालेले हे यश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. मुंबईतील हा निकाल पाहता येथील जनता अजूनही बऱ्यापैकी ठाकरे यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मतदारांचे आभार मानण्यात आले होत. मात्र, हे आभार मानताना ठाकरे यांनी दलित आणि बौद्ध समाजाचा उल्लेख न केल्याने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे प्रचंड संतापले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करुन आपल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'गरज सरो वैद्य मरो'चे उत्तम उदाहरण. उच्चवर्णीय हिंदू नी भाजपाला मतदान केले आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. ह्या निवडणुकीत दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआ ला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलीत, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता! दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
'गरज सरो वैद्य मरो'चे उत्तम उदाहरण -
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 17, 2024
उच्च वर्णीय हिंदू नी भाजपा ला मतदान केले आणि उबाठा शिव सेना किंवा महा विकास आघाडीला नाही.
ह्या निवडणुकीत दलीत, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआ ला मतदान केले.
पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलीत, बौद्ध यांच्या… pic.twitter.com/Qo2xEbBDq7
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांनी मतदान केले. ज्यामध्ये मराठी होते, हिंदू होते, मुस्लीम होते आणि ख्रिश्चनदेखील होते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यात दलित आणि बौद्ध समाजाचा उल्लेख नसल्याने सोशल मीडियावर अनेकजण नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अनुक्रमे संजय दिना पाटील, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे तीन उमेदवार विजयी झाले होते. या मतदारसंघांमधील बौद्ध आणि दलितबहुल भागात ठाकरे गटाला भरभरुन मतदान झाले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितची पाटी कोरी
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित-एमआयएम फॅक्टर प्रचंड प्रभावी ठरला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. या पराभूत नेत्यांमध्ये काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा समावेश होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित-एमआयएम युतीचे इम्तियाज जलील खासदार झाले होते. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा प्रभाव तितकासा जाणवला नाही. एकाही जागेवर वंचितचा उमेदवार विजयी झाला नव्हता.
आणखी वाचा