Eknath Shinde & Uday Samant : एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेत्याने पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला
Eknath Shinde & Uday Samant : राजन साळवींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्याने सामंत बंधूंवर निशाणा साधलाय.

Eknath Shinde & Uday Samant : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आता यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पुन्हा एकदा सामंत बंधूंना डिवचले आहे. सध्या शिंदे गटामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध उदय सामंत यांच्यात तुंबळ युद्ध चालू आहे, असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
विनायक राऊत म्हणाले की, सध्या शिंदे गटामध्ये दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरु आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध उदय सामंत असे युद्ध सुरु आहे. राजन साळवी यांचा पक्षप्रवेश एकनाथ शिंदे यांनी केला. सामंत बंधू यांना राजन साळवी नको होते. पण रत्नागिरीमध्ये आमची ताकद किती आहे हे एकनाथ शिंदे यांनी दाखवलं. राजकारणात मला डावललं तर किती भारी पडेल यामुळे आज उदय सामंत यांनी शक्ती प्रदर्शन केलं. MIDC चा फायदा दाखवत कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचलं. मात्र, शिवसेना पुन्हा कोकणात ताकदीने उभी करण्याची क्षमता आमच्यात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
भास्कर जाधवांनी ठाकरेंशी चर्चा करायला हवी होती
शिवसेना ही राख आलेल्या निखाऱ्यासारखी झाली आहे. त्यावर फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केलं होतं. यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. याबाबत विचारले असता विनायक राऊत म्हणाले की, त्यांचं विधान मी ऐकलं नाही. विधिमंडळाचा नेता कोण? या संदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळी सर्वांनीच एका मताने भास्कर जाधव यांचं नाव सुचवलं होतं. पण पुढे काय त्यांना बोलायचं आहे ते मी ऐकलं नसल्यामुळे प्रतिक्रिया देऊ शकत नाही. त्यांची नाराजी असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करायला पाहिजे होती, असे त्यांनी म्हटले.
लव्ह जिहादला आमचाही विरोध
राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद आणि फसवणूक, बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली आहे. महाराष्ट्रात जर असा कायदा झाला तर महाराष्ट्र हे देशातील दहावे राज्य असणार आहे. याबाबत विचारले असता विनायक राऊत म्हणाले की, त्यांचं सरकार आहे ते नवीन कायदा आणू शकतात. लव्ह जिहादला आमचा देखील विरोध आहे. सर्वांना एकत्रित आणून हा कायदा आणत असेल तर त्यात काही चुकीचं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
आणखी वाचा
Eknath Shinde : देर आए दुरुस्त आए... राजन साळवी खऱ्या शिवसेनेत सामील झाले; एकनाथ शिंदे काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

