तिढा सुटला, शिंदे गटाची पहिली यादी आज? नाशिक, यवतमाळ, रायगडसह मुंबईच्या जागांकडे लक्ष
Shiv Sena Candidates List : शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता, नाशिक, यवतमाळ आणि रायगड या मतदारसंघांचा समावेश असणार का याकडे लक्ष
Shiv Sena Eknath Shinde Group Candidates List : मुंबई : लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं असून राज्यात सर्व पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी राज्यात सत्तेत असलेली महायुती (Mahayuti) आणि विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. भाजप (BJP), ठाकरे गट (Thackeray Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) काही जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पण, गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणाला ज्यांच्यामुळे अभूतपूर्व कलाटणी मिळाली आणि शिवसेनेत उभी फूट पडली, त्या शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र अद्याप एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाही. आज शिवसेना शिंदे गटाची आठ जागांची यादी जाहीर होऊ शकते, अशी चर्चा समोर आली आहे.
महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप काही सुटण्याचं नाव घेत नाही. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजुनही काही जागांबाबतचा तिढा कायम आहे. तर काही जागांवर अद्याप उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. अशातच आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी होणार आहे. तरिदेखील शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप यादी जाहीर करण्यात आलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शिंदेंच्या शिवसेनेची आठ जागांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या यादीत कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार, हे स्पष्ट होणार आहे.
आनंदराव अडसूळ नाराज? वर्षावरच्या बैठकीनंतर बातचित न करताच काढता पाय
मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागावाटपां संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून एबीपी माझाच्या हाती लागली आहे. त्यामुळे आज जाहीर होणाऱ्या शिंदे गटाच्या यादीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. बैठकीनंतर आनंदराव अडसूळ माध्यमांशी बातचीत न करता निघाले. त्यामुळे आज ते अमरावतीच्या जागेविषयी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून वाद सुरू असलेल्या नाशिक, यवतमाळ, रायगड, ठाणे आणि मुंबई या जागांवर प्रामुख्यानं लक्ष आहे. महायुतीत अखेर या जागांचा तिढा सुटलाय का? आणि तिढा सुटला असेल तर या जागा कोणाच्या वाट्याला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :