''दिल्लीला चाललोय, केंद्रात करतो ना बरोबर''; शरद पवारांनी फोनवरुन लंकेंना सांगितलं, राजकीय उलथापालथ होणार का?
मला तर विश्वासच बसत नाही,मी खासदार झालोय ते. मी दहावेळा कार्यकर्त्यांना विचारलं मी खरंच खासदार झालो का, असे म्हणत निलेश लंके यांनी विजयावर प्रतिक्रिया दिली
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं असून निवडणुकांच्या काही दिवस अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारांचाही विजय झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यात, सर्वाधिक चर्चा आहे ती अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार निलेश लंके. निलेश लंकेंनी अमहदनगरमधून विद्यमान खासदार सुजय विखेंचा (Sujay Vikhe patil) पराभव केला. विशेष म्हणजे लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर, सुजय विखेंविरुद्ध दंड थोपटले. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक असल्याचं निलेश लंके (Nilesh Lanke) आपल्या प्रचारातून सातत्याने म्हणत होते. तर, एक सर्वसामान्य व्यक्ती ते बलाढ्य अशी ही लढत असल्याचा प्रचारही त्यांनी केला. त्यामुळे, येथील निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर निलेश लंकेंनी सुजय विखेंचा पराभव करत विजयी जल्लोष केला. त्यानंतर, माध्यमांना प्रतिक्रिया देताना आता दिल्लीला जाऊन इंग्रजीत भाषण करणार असल्याचंही त्यांनी म्हटले.
मला तर विश्वासच बसत नाही,मी खासदार झालोय ते. मी दहावेळा कार्यकर्त्यांना विचारलं मी खरंच खासदार झालो का, असे म्हणत निलेश लंके यांनी विजयावर प्रतिक्रिया दिली. तसेच, शरद पवार यांची भेट घेण्यासाठी केव्हा जाणार असा प्रश्न विचारला असता. मी शरद पवार यांना फोनवरुन बोललो. मात्र, ते दिल्लीला बैठकीसाठी जाणार आहेत. ''मी दिल्लीला चाललोय, केंद्रात करतो ना बरोबर मी'', असे शरद पवार यांनी फोनवरुन म्हटल्याचे निलेश लंके यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. तसेच, दिल्लीवरुन ते आल्यानंतर मी त्यांच्या भेटीसाठी जाणार असल्याची माहितीही लंकेनी दिली.
समोर जड पहिलवान असताना आपला बारीक पहिलवान जिंकला अशी प्रतिक्रिया अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी दिली आहे. निवडणूक काळात मोठी धास्ती वाटत होती, कारण हे मोठे लोकं आहेत, मशीनमध्ये घोटाळा करू शकतात अशी चर्चा होती. एवढंच काय तर निवडणूक काळात निलेश लंके यांचा अपघात व्हावा, त्यांचं काही बरं वाईट व्हावं, यासाठी मोठ-मोठ्या पूजा घालण्यात आल्याचा गंभीर आरोप निलेश लंके यांच्या आईने केला आहे. तसेच, या पुजेंसाठी एक-एक, दोन-दोन लाख रुपये घातल्याचेही शकुंतला लंके यांनी म्हंटल आहे.
आता मी खासदार झालो आहे, जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख झालो आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणी माझ्यावर टीका केली ते विसरुन जनतेच्या प्रश्नासाठी काम करणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं. या जिल्ह्याचा कुटुंबप्रमुख असल्याने मी सर्व गोष्टी पोटात घेऊन पुढचं काम करणार आहे. सोबतच ज्या मुद्द्यावर मला जनतेने निवडून दिलं, तो म्हणजे कांदा निर्यातबंदी आणि दूध दरवाढ. आचारसंहिता संपल्यानंतर मी या दोन्ही मुद्द्यांना घेऊन मोठ आंदोलन करणार असल्याचा इशाराही लंके यांनी दिला. एकूणच सरकार कोणाचेही असो, मात्र शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती आपण आवाज उठवणार आहे, असे लंकेंनी म्हटले. तर, सत्कारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून, मी सोडून इतर सर्वजण खासदार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळेलच आणि सध्या पाहायला मिळत आहे, असेही ते म्हणाले.
लंकेंचा 28 हजारांनी विजय
अवघ्या राजाचे लक्ष लागलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी 28 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. त्यामुळे, आज सकाळपासून त्यांच्या हंगा येथील निवासस्थानी त्यांच्या समर्थकांची सत्कारासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळाले. तर, दुसरीकडे त्यांच्या पत्नी राणी लंके या त्यांच्या छोटेखानी स्वयंपाक घरात कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं. निलेश लंके हे जरी खासदार झाले असले तरी आमची दैनंदिन कामं सुरूच राहतील. आमच्याकडे ना कुणी कामगार आहेत, ना कुणी स्वयंपाकी. आम्हीच आमच्या घरातील सर्व कामं करतो, असं राणी लंके अभिमानाने सांगतात.