इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिले आहेत.
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) येणाऱ्या इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली असून विद्यमान आमदारांपैकीही काही नेते तुतारी फुंकण्याच्या शर्यतीत आहेत. भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमातूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad pawar) पक्षाच्यावतीने त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje) यांचा मेळावा पुढील आठवड्यात फलटण येथे होणार आहे. या मेळाव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून मेळाव्यापूर्वीच शरद पवारांनी गुपित उलगडलं आहे.
विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी महायुतीत होणारा अन्याय आणि त्रासाचा दाखला देत तुतारी हाती घेण्याची भूमिका मांडली होती. मात्र, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. कार्यकर्ते महत्वाचे असून ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. पुढील आठवड्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत ही भेट होणार असल्याची शक्यता आहे. या भेटीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या भावना अजित पवारांसमोर मांडल्या जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीपूर्वीच शरद पवारांनी इंदापूरच्या कार्यक्रमातून थेट फलटणमधील मेळाव्याचे जाहीर केले.
इंदापूरच्या कार्यक्रमाला निघण्यापूर्वीच कुठूनतरी फोन आला. म्हणाले 14 तारखेला आमच्याकडे यावेच लागतंय. मी म्हणालो काय कार्यक्रम आहे, ते म्हणाले इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच आमच्याकडे आहे. मी म्हटलं कुठं, ते म्हणाले फलटणला... असे म्हणत शरद पवारांनी फलटणमधील रामराजे निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश कार्यक्रमाचे संकेतच दिले आहेत. तसेच, आता, याच्यानंतर फलटण, आणि फलटणनंतर जवळपास 1 महिन्याचे सगळे दिवस बुक झाले आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी पक्षाकडे येणाऱ्या इच्छुकांची व उमेदवारांची गर्दी वाढत असल्याचे स्पष्ट केले.
दत्तात्रय भरणेंवर अप्रत्यक्ष टीका
शंकरराव पाटील यांनी आमच्यापुढे आदर्श ठेवला, त्यांच्या विचारांचा वारसा हर्षवर्धन पाटील यांनी स्वीकारला. माझं लक्ष इंदापूर कडे होते, कारखाना चेअरमन, जिल्हा परिषद अध्यक्ष, मंत्री दिले. अपेक्षा होती की कारखानदारी वाढेल पण जे ऐकले त्याचा मला धक्का बसला. इंदापूरचे राजकारण नव्या पैशाचा धक्का न लावण्याचे होते, पण अलीकडे वेगळे राजकारण इथे पाहायला मिळाले. एक बोर्ड दिसला की, मलिदा गॅंग. बारामतीत ऐकले होते पण इथेही आहे, असे म्हणत नाव न घेता दत्तात्रय भरणे यांच्यावर शरद पवारांची टीका केलीय.
हेही वाचा
अटल सेतू ठरतोय श्रीमंत अन् व्यवसायिकांचा लाडका; महागड्या टोलमुळे 70 टक्के कमी वाहतूक