Savli Dance Bar : सावली डान्सबारवरून अडचणीत आलेल्या कदम कुटुंबियांचा बचावात्मक पवित्रा, 'तो' परवाना केला परत? नेमकं प्रकरण काय?
Savli Dance Bar : अनिल परब यांनी कांदिवलीमधील सावली बार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

Savli Dance Bar : विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी कांदिवलीमध्ये सावली बार (Savli Bar) असून तो ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यानंतर विरोधकांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता विरोधकांकडून राजीनाम्यासाठी जोर वाढत असतानाच कदम कुटुंबीयांनी बचावात्मक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेला सावली बारमधील ॲार्केस्ट्राचा परवाना कदम कुटुंबियांनी परत केल्याची माहिती समोर येत आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झालेली असताना ॲार्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना कदम कुटुंबीयांनी ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे.
सावली बारमधील ॲार्केस्ट्राचा परवाना केला परत
कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला, त्यासोबतचा करारनामा अगोदरच रद्द केला आहे. गृहराज्यमंत्री कदम यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली असतानाच बचावात्मक पवित्रा घेण्याचा पवित्रा कदम कुटुंबियांनी घेतला आहे. सावली बार आधी ॲार्केस्ट्रा परवाना असताना तिथं डान्सबार चालवत असल्यानं कारवाई झाली होती. त्यानंतर योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यातच आता कदम कुटुंबीयांनी सावली बारमधील ॲार्केस्ट्राचा परवाना परत केल्याची माहिती समोर येत आहे.
अनिल परबांनी केला होता आरोप
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अनिल परब म्हणाले होते की, कांदिवली येथे सावली बार आहे. इथे पोलिसांनी धाड टाकली, त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. 22 बारबाला 22 कस्टमर आणि 4 कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. या ठिकाणी कस्टमरवर गुन्हा दाखल झाला. या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. तर एकीकडे लाडक्या बहिणीचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणीना डान्सबारमध्ये नाचवता? आजच्या आज गृह राज्यमंत्री यांचा राजीनामा घ्यावा. अजित दादा तुम्ही योग्य ती कारवाई कराल. जे मुख्यमंत्री आज कारभार सांभाळतात त्यांनी गृहराज्यमंत्री यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर सरकारचा पाठींबा आहे, हे सिद्ध होईल, असे देखील अनिल परब म्हणाले होते.
रामदास कदमांचा अनिल परबांवर पलटवार
अनिल परब यांच्या आरोपानंतर रामदास कदम यांनी त्यांच्यावर पलटवार केला होता. अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. अर्धवट वकिलांचा सल्ला घेऊन नेहमी उद्धव ठाकरे चालतात म्हणूनच उद्धव ठाकरेंची ही परिस्थिती झाली आहे. सावली बार शेट्टी नावाचा इसम चालवतो. हे वास्तव आहे की तो माझ्या पत्नीच्या नावावर आहे. तिथे एक प्रसंग घडला, तिथे त्या इसमाने एका मुलीवर पैसे उधळले. त्यानंतर मी सर्व लायसन्स पोलीसांकडे जमा केले. रामदास कदम म्हणून कुठेही बदनाम करता येत नाही, यासाठी हे सर्व सुरू आहे, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
























