Satara Politics : साताऱ्यात मविआचे चार उमेदवार निश्चित? जागा वाटपानंतर चार मतदारसंघांचा तिढा सुटणार
Maharashtra Assembly Election : सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यापैकी चार जागांवर मविआचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.
सातारा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे 8 मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होईल. महायुतीमध्ये सिटिंग गेटिंग या सूत्रानुसार 6 जागांवर विद्यमान आमदार रिंगणात असतील. कराड उत्तर आणि कराड दक्षिणसाठी महायुतीला उमेदवार जाहीर करावा लागू शकतो. साताऱ्यात महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि कोरेगाव या चार मतदारसंघातील मविआचे उमेदवार कोण असतील याचं चित्र स्पष्ट आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून निवडणूक लढवतील. यावेळी विजयी झाल्यास ते सहाव्यांदा आमदार बनतील. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पाटणमध्ये सत्यजीतसिंह पाटणकर आणि कोरेगावमधून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आमदार आहेत. जागा वाटपाच्या चर्चेत निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी देण्याचं सूत्र मविआनं स्वीकारल्यास या जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळतील. कराड दक्षिणमधून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असतील.
सातारा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दिला जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. साताऱ्यात 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून दीपक पवार यांनी निवडणूक लढवली होती. सध्या ते पुन्हा इच्छुक आहेत. त्यामुळं साताऱ्याची जागा ठाकरेंना मिळणार की शरद पवारांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. साताऱ्याची जागा ठाकरेंना मिळाल्यास सचिन मोहिते उमेदवार असू शकतात.
वाई अन् फलटणचं काय?
गेल्या विधानसभा निवडणुकीत या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं लढल्या होत्या. वाईत मकरंद पाटील आणि फलटणला दीपक चव्हाण आमदार आहेत. हे दोघेही सध्या अजित पवारांसोबत आहेत. वाई आणि फलटणमध्ये मविआचा उमेदवार कोण असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मदन भोसले आणि जयंत पाटील यांच्यात काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. पण ती भेट वैयक्तिक असल्याचं सांगण्यात आलं होतं. दुसरीकडे फलटण विधानसभा मतदारसंघात रामराजे नाईक निंबाळकर काय भूमिका घेतात यावर मविआचा उमेदवार कोण असणार आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास दीपक चव्हाण मविआचे उमेदवार असू शकतात.
माणमध्ये काय होणार?
माणच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक जण इच्छुक आहेत. अनिल देसाई, अभयसिंह जगताप आणि प्रभाकर घार्गे हे तीन दावेदार आहेत. शरद पवार कुणाला उमेदवारी देतात यावर इथला उमेदवार निश्चित होईल.
इतर बातम्या :