Sanjay Raut on Raj Thackeray: काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा, संजय राऊतांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, आम्ही दिल्लीत...
Sanjay Raut on Raj Thackeray: स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut on Raj Thackeray: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आगामी निवडणुकीत राजकीय युती होणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याला महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांचा पाठिंबा मिळणार का? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही, असे वक्तव्य केले. तसेच, महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचे असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल, असे देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. मात्र, याचा अर्थ तो निर्णय नाही. या राज्यात प्रत्येकाचे एक स्थान आहे. जसे शिवसेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, शरद पवार साहेबांचे, डाव्या पक्षांचे तसेच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे. शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचं आहे. ही सर्वांचीच भूमिका असून राज ठाकरेंची सुद्धा तीच भूमिका आहे.
Sanjay Raut: दिल्लीत आम्ही चर्चा करत आहोत
महाविकास आघाडीत मनसेला घ्यायचे असल्यास तो निर्णय दिल्लीतून होईल, असे देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्यांचे म्हणणे बरोबर आहे. दिल्लीत आम्ही चर्चा करत आहोत किंवा आमची चर्चा झाली आहे. काल सुद्धा माझी सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी काही विषयावर चर्चा झाली. मी राहुल गांधींशी देखील चर्चा करेन. उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करतील असे त्यांनी म्हटले. उद्याचे शिष्टमंडळ आहे ते सर्वपक्षीय शिष्टमंडळ आहे हे हर्षवर्धन सपकाळ यांनी समजून घ्यावे. हा विषय एका पक्षाचा नाही, असे त्यांनी म्हटले.
Sanjay Raut on Devendra Fadnavis: नाशिकमध्ये जे आदेश दिले तेच ठाण्यात द्या
संजय राऊत पुढे म्हणाले की, मनसे आणि शिवसेनेचा आज मोर्चा आहे. ठाणे महापालिका हद्दीत गुंडगिरी, भ्रष्टाचार सुरु आहे. त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे. ठाणे महापलिका आयुक्तांना लाच स्वीकारताना अटक केली. हे मिंधे गटाचे हस्तक होते. महाराष्ट्राला कलंक लावणारे हे काम आहे. नाशिक जिल्ह्यात जे आदेश दिले आहेत ते आदेश ठाणे जिल्ह्यात द्यावे. मुख्यमंत्र्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी गुन्हेगारी मोडून काढण्याचे आदेश दिले. त्यांनी भाजप कार्यकर्त्याला सुद्धा सोडले नाही. हे असेच ठाणे जिल्ह्यात करा, अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
आणखी वाचा

























