Sandeep Deshpande on Ajit Pawar : सरकारला खडबडून जागे केल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नाही; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर संदीप देशपांडे स्पष्टच बोलले
Sandeep Deshpande on Ajit Pawar : हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी मुंबईत एकत्र मोर्चा काढणार आहेत.

Sandeep Deshpande on Ajit Pawar : महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिल्यापासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला सध्या राज्यभरातून तीव्र विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘हिंदी विरुद्ध मराठी’ असा वाद चांगलाच पेटला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या ५ जुलैला मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चा काढायची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी पुण्यात स्पष्ट केले. तसंच, "चर्चेच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा निघू शकतो," असंही ते म्हणाले. त्यामुळे आता महायुती सरकार मोर्चापूर्वीच हिंदी भाषेसंदर्भात कोणता निर्णय घेणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आता यावर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, ज्या पद्धतीने महाराष्टाचे वातावरण तयार झाले आहे. तेव्हा सरकार जागे होऊ लागले आहे. पण खडबडून जागे केल्याशिवाय आम्ही मोर्चा मागे घेणार नाही. मोर्चा मागे घ्यायचा की नाही घ्यायचा, याबाबत सर्व निर्णय राज ठाकरे घेतील. याआधी सरकारने फसवणूक केलेली आहे. म्हणून शासन निर्णय आल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकार का घाई करत आहे?
संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, NEP मध्ये म्हटलेले आहे की, तृतीय भाषा घ्यावी की नाही याचा निर्णय राज्य सरकारला आहे. मग राज्य सरकार का घाई करत आहे? आज नुसतेच राजकीय पक्ष नाही तर भीमसैनिक संघटनेने देखील मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. भाजपच्या मंत्र्यांचे स्टेटमेंट ऐकले तर ते म्हटले आहे की, मी हिंदी बोलणार नाही. अजित दादांचे देखील वक्तव्य बघा. ते विरोधक नाही तर ते सत्ताधारीच आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दादा परखड बोलले : सचिन अहिर
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत म्हणाले की, चला किमान एक गोष्ट मान्य केली, की आमचा मुद्दा रास्त होता. दादा परखड बोलले,त्याचे स्वागत केले पाहिजे. सर्व मराठी माणसाची धास्ती आहे. सरकार बोलताना एक बोलत आहे, वागत एक आहे. सरकारचा सक्ती करण्याचा निर्णय आहे. एक उपमुख्यमंत्री बोलत आहे आणि दुसरे शांत आहे. त्यांचे जे लोक आहे ते मूळ विषयावरून बगल देण्याचे काम करत आहे. जीआर त्यांनी काढला, आम्ही काढला नाही . सबकमिटीचा अहवाल स्वीकारला, पण आम्ही कॅबिनेटमध्ये कुठे त्याचा जीआर काढला? हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी काढला आहे. मला वाटते तो जीआर रद्द केला पाहिजे, असे त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा























