Lok Sabha Election 2024 : रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिला, त्यामुळेच मविआ नेते निलेश लंकेचा बळी देतायत; सुनील शेळकेंचा खळबळजनक आरोप
Lok Sabha Election 2024 : निलेश लंकेना दक्षिण नगरमधून लोकसभा लढायची अजिबात इच्छा नाही. पण रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिला, त्यामुळं जाणीवपूर्वक त्यांना महाविकास आघाडीकडून आग्रह केला जातोय, असं सुनील शेळके म्हणाले आहेत.
Nilesh Lanke, Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटातील (Ajit Pawar Group) पारनेरचे आमदार (Parner Assembly Constituency) निलेश लंकेचा (MLA Nilesh Lanke) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बळी घेतेय, असा आरोप निलेश लंकेंचे जवळचे मित्र आणि आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांनी केला आहे. निलेश लंकेना दक्षिण नगरमधून लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) लढायची अजिबात इच्छा नाही. पण रोहित पवारांनी (Rohit Pawar) लोकसभा लढण्यास नकार दिला, त्यामुळं जाणीवपूर्वक त्यांना महाविकास आघाडीकडून आग्रह केला जात आहे, असा दावा सुनिल शेळकेनीं केला आहे. सुनील शेळकेंना नुकताच शरद पवारांनी (Sharad Pawar) सज्जड दम दिला होता, मात्र आता या प्रकरणाला सोडून मी पुढं जाणार आहे. पण मी पवार साहेबांना भेटून त्यांचं मार्गदर्शन घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळकेंनी बोलताना म्हटलं की, गेल्या आठ ते नऊ महिन्यांमध्ये ज्या घडामोडी घडल्या, त्यावेळी मी आणि निलेश लंकेंनी अजितदादांसोबत राहायचं ही ठाम भूमिका घेतली. शेवटी सत्तेशिवाय पर्याय नाही किंवा सत्तेत असल्यानंतर मतदारसंघातील कामं होणं आणि कामांना प्राधान्य देणं, हेदेखील महत्त्वाचं आहे. पण ज्यावेळी आम्ही अजितदादांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि जी भूमिका घेतली, त्यावेळी आम्ही पुढे जे काय होईल, त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवली होती. पण गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून निलेश लंकेच्या मागे अनेकजण लागले आहेत. तसेच, निलेश लंकेंना दक्षिण नगरच्या लोकसभेसाठी उभं राहण्याची गळ घातली जात आहे."
रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिल्यामुळे निलेश लंकेंचा बळी : सुनील शेळके
"महायुतीची दक्षिण नगरची जागा सध्या भाजपच्या ताब्यात असल्यामुळे ती जागा त्यांनाच मिळेल हे जवळपास निश्चित आहे. जर ती जागा भाजपकडेच जाणार असेल आणि तिथे महाविकास आघाडीसाठी पर्याय शिल्लक नव्हता. ज्यांना पर्याय म्हणून उभं केलेलं त्या रोहित पवारांनी लोकसभा लढण्यास नकार दिला. त्यामुळेच निलेश लकेंना गळ घालून तिथून लोकसभा लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाग पाडलं जात आहे. पण मला विश्वास आहे, निलेश लंके कुठेच जाणार नाहीत, ते दादांसोबतच राहतील.", असं सुनील शेळके म्हणाले.
निलेश लंकेंचा महाविकास आघाडीकडून बळी दिला जातोय : सुनील शेळके
सुनिल शेळकेंनी निलेश लंकेंचा महाविकास आघाडीकडून बळी दिला जात आहे, असं म्हटलं. ते म्हणाले की, "दक्षिण नगरची जागा महायुतीमध्ये भाजपला मिळाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रोहित पवारांना उभं राहण्यासाठी आग्रह केला होता. पण तेथील परिस्थिती डोळ्यांनी पाहिल्यानंतर रोहित पवारांनी माघार घेत, लोकसभा लढण्यास नकार दिला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंना गळ घालून महाविकासाघाडीकडून लोकसभा लढवण्यासाठी बळी दिला जात आहे. महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंची समजूत घातली जात आहे. त्यांनी विधानसभा सोडून लोकसभेत जाण्याची तयारी नसताना, मग तुम्ही नाहीतर निदान कुटुंबातील कोणालातरी उभं करा, अशी गळ घातली जात आहे."
मार्गदर्शनासाठी मी शरद पवारांची भेट घेणार : सुनील शेळके
शरद पवारांनी सुनील शेळकेंना काही दिवसांपूर्वी तंबी दिल्याचं बोललं जातं. याबाबत बोलताना सुनील शेळके म्हणाले की, "शरद पवार आमचे श्रद्धास्थान आहेत. इथल्या स्थानिक मंडळींनी त्यांना काहीतरी चुकीची माहिती दिली. त्यातून त्यांच्या मनात वेगळे गैरसमज पसरवण्याचं काम केलं. पण मी सांगितलं की, त्याच्याविषयी आजही आमच्या मनात तेवढाच आदर आहे. शेवटी राजकारण आहे. राजकारणात सगळं काही आलबेल असतं असं नाही. मी शरद पवारांची लवकरच भेट घेणार आहे. त्यांनी वडिलकीच्या नात्यानं नेहमीच मला समजावलं आहे. पण मार्गदर्शनासाठी मी नक्कीच भेट घेईल."
मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार : सुनील शेळके
मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी यासाठी मी गेल्या चार महिन्यांपासून आग्रही आहे. त्यासाठी मी सर्व वरिष्ठांना लोकसभा मतदारसंघातील समीकरणंही समजावून सांगितली आहेत. त्यामुळे येत्या काळात मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळेल, असा विश्वास मला आहे, असं सुनील शेळके म्हणाले.