(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंत्री अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनी रसद पुरवली? ऑडीओ क्लिप्स व्हायरल, कदम यांनी आरोप फेटाळले
अनिल परब यांच्याविरोधात रामदास कदम यांनी रसद पुरवली असल्याचा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, रामदास कदम यांनी आरोप फेटाळले आहेत.
मुंबई : शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केलं. परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवून भाजपचे किरीट सोमय्या यांना दिली, असा खळबळजनक आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मात्र, हे सर्व आरोप फेटाळले असून
रामदास कदम काय म्हणाले?
त्या सर्व क्लिप्स माझ्या नसून माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. अनिल परब माझे जवळचे मित्र आहेत. तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो किरीट सोमय्यांशी मी संपर्क साधला नाही. या तसूभरही सत्य नाही. माझ्यावर आरोप करणाऱ्या दोघांनी कधीकाळी माझ्या हाताखाली काम केलं आहे. त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करुन दुसऱ्या पक्षात गेल. संजय कदम याला माझ्या मुलानेच पाडलंय. आता माझा मुलगा आमदार आहे. मोठ्या फरकाने पराभव झाल्याने माझ्याविरोधात कुरघोड्या करत आहेत. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे मी बाहेर काढली आहेत. त्यामुळेच मागच्या तीन महिन्यात दहा पत्रकार परिषदा माझ्याविरोधात घेतल्या आहेत. संजय कदम यांच्यावर मी सहा कोटीची अब्रुनुकसानीचा दावा टाकलेला आहे. वैभव खेडेकर यांच्यावरही दावा टाकला आहे. खोट्या क्लिप पसरवून माझी बदनामी केली जात आहे. गेल्या दहापंधरा वर्षात मी सोमय्यांना एकदाही भेटलेलो नाही. माझा मुलगा आमदार असून त्याला अनिल परब यांचा मोठा पाठींबा आहे, असे स्पष्टीकरण माजी मंत्री रामदास कदम यांनी दिलं आहे.
कदम यांच्यावर काय आरोप आहेत?
वैभव खेडेकर यांच्या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील खेडेकर म्हणाले. रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या बेनामी संपत्तीचे माहिती देखील जगासमोर आणावी असे आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट बाबत माहिती उघड केली होती. हे रिसॉर्ट मंत्री परब यांनी बेहिशोबी पैशातून बांधले असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्री पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी प्रसारमाध्यमांसमोर केली होती.