Raj Thackeray-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या 'प्रतिसाद'नंतर राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना सूचना; म्हणाले, संवेदनशील विषयावर...
Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र येण्याची साद घातली. यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला. यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावरुन विविध राजकीय चर्चा सुरु आहे. राज्यातील विविध पक्षातील नेत्यांनी देखील ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच आहे, असं अनेकजण बोलताना दिसले. मात्र आता राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना सूचना दिल्या आहेत.
संवेदनशील विषयावर 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका-
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नाबाबत 29 तारखेपर्यंत बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी याबाबत एबीपी माझाला माहिती दिली. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
मनसेत शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत नाराजीचे वारे?
मनसेचे नेते संदीप देशपांडे कालपासून माध्यमांशी संवाद साधताना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर बोलताना दिसले. तसेच मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आणि अमेय खोपकर यांच्या ट्विटने देखील लक्ष वेधलं होतं. अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं होतं. तर मात्र एकत्र येण्यासाठी एक अट देखील उद्धव ठाकरेंनी बोलावून दाखवली. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, हे आधी ठरवा, असं उद्धव ठाकरे राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले. त्यानंतर मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची आठवण संदीप देशपांडेंकडून करण्यात आली. तसेच मनसैनिकांवर गुन्हे दाखल केल्याने उद्धव ठाकरे देखील माफी मागणार का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. त्यामुळे मनसेत युतीबाबत नाराजीचे वारे वाहताय की काय?, असं बोललं जात आहे.

























