Raj Thackeray-Uddhav Thackeray: राज ठाकरेंना अडकवले अन् गाडे घसरले; ती अट मानू नका, त्यात उद्धव ठाकरेंची वेदना, सामना अग्रलेखाची चर्चा
Raj Thackeray-Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली. यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला.

Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र येण्याची साद घातली. यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला. मात्र एकत्र येण्यासाठी एक अट देखील उद्धव ठाकरेंनी बोलावून दाखवली. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, हे आधी ठरवा, असं उद्धव ठाकरे राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले. त्यानंतर मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची आठवण संदीप देशपांडेंकडून करण्यात आली. तसेच मनसैनिकांवर गुन्हे दाखल केल्याने उद्धव ठाकरे देखील माफी मागणार का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. त्यानंतर आता आज (21 एप्रिल) ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' अग्रलेखामधून यावर भाष्य करण्यात आले आहे.
...त्यास कोणी अट किंवा शर्त मानू नये-
राज ठाकरे ज्यास आमच्यातील वाद म्हणतात ते उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहेत. हे वाद कसले? ते कधीच बाहेर आले नाही. राज मराठी माणसांविषयी बोलत राहिले व शिवसेनेचा जन्मच मराठी हितासाठी झाला आणि ते हित उद्धव ठाकरे यांनी सोडले नाही. मग वाद असले? राज यांच्या वतीने भाजप, मिंधे वगैरे लोकच बोलू लागले व तसे बोलण्याचे काहीच कारण नव्हते. या लोकांनी वाद सुरू केले. त्यामुळे भाजप, मिंधे या लोकांना दूर ठेवले तर वाद राहतोच कोठे? एकत्र येण्यासाठी इच्छा हवी. राज म्हणतात ते खरे आहे, पण कोणाच्या इच्छेविषयी ते बोलत आहेत? राज यांनी त्यांची इच्छा व्यक्त करताच उद्धव ठाकरेही मागे राहिले नाहीत व महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्यांनीही दमदारपणे एक पाऊल पुढे टाकले. काही किरकोळ वाद असलाच तर तो बाजूला ठेवून मीसुद्धा महाराष्ट्र हितासाठी एकत्र काम करायला तयार असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. ही महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान व महाराष्ट्राचे कल्याण यापुढे मतभेद वगैरे शून्य आहेत, पण राज यांनी महाराष्ट्राच्या शत्रूच्या पंगतीला यापुढे बसू नये व महाराष्ट्रद्रोह्यांना घराच्या उंबरठ्याबाहेरच ठेवावे ही माफक अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केली असेल तर त्यास कोणी अट किंवा शर्त मानू नये. महाराष्ट्राच्या शत्रूना घरात थारा देऊ नये असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यामागे एक वेदना आहे.
राज ठाकरे यांना या एकजुटीचे महत्त्व पटले-
मराठी माणसाची एकजूट कमजोर केली की, महाराष्ट्रापासून मुंबईचा तुकडा पाडता येईल हे भाजप व त्यांच्या व्यापारी मंडळाचे सरळ गणित आहे. म्हणूनच त्यांनी मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहणारयांचे डोळे काढून हातात देणाऱया मराठी एकजुटीवर प्रहार करण्याचे सातत्याने प्रयत्न केले. मराठी एकजुटीची वज्रमूठ असलेल्या शिवसेनेवरही त्यांनी घाव घातला आणि त्यासाठी कुन्हाडीचा दांडाच वापरण्यात आला. चार वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. महाराष्ट्र विधानसभा भाजप व त्यांच्या व्यापारी मंडळाने कशा जिंकल्या त्याचे गणित वॉशिंग्टन मुक्कामी असलेल्या तुलसी गबार्ड यांनी सांगितलेच आहे. अर्थात, या सगळ्या महाराष्ट्रद्रोह्यांशी लढण्याची हिंमत आणि ताकद फक्त मराठी माणसात आहे. त्यामुळे मराठी माणसाने एकत्र यायलाच हवे. राज ठाकरे यांना या एकजुटीचे महत्त्व पटले आणि उद्धव ठाकरे यांनीही मनमोकळेपणाने प्रतिसाद दिला.
दोन 'बंधू' एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा-
महाराष्ट्रद्रोह्यांची दाणादाण उडवणारी ही राजकीय घडामोड आहे. दोन 'बंधू' एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा येऊन ते चिडचिडपणा करू लागले, तर काही जण चेहन्यावर खोटा आनंद आणून "व्वा, छान! दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच" असे सांगत आहेत, पण महाराष्ट्रद्रोह्यांचा हा आनंद खरा नाही. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडावे. वाद, भांडणे यात उभे आयुष्य गेले तर महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत. भाजपचे राजकारण हे 'वापरा आणि फेका' या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले. महाराष्ट्रात कृष्णा-कोयनेचा प्रवाह शुद्ध व्हावा व त्या शुद्ध प्रवाहात सगळ्यांनी उतरावे ही त्यांची भूमिका नाही. प्रयागराजच्या गढूळ, अशुद्ध प्रवाहात त्यांनी सगळ्यांना उतरवले व धर्माचा धंदा केला. महाराष्ट्रातील मराठी जनतेने बोध घ्यावा व प्रत्येक पाऊल जपून टाकावे असा हा विचित्र आणि विषारी कालखंड सुरू आहे. विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला हवेच आहे, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.
























