Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंची साद, उद्धव ठाकरेंकडून लगेच प्रतिसाद; पण मनसेत युतीबाबत नाराजीचे वारे?, नेमकं काय घडलं?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: मनसेत संभाव्य युतीबाबत नाराजीचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा राजकारणात नेहमी होते. आता खुद्द दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी एकेक पाऊल पुढे टाकलंय. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्यांना प्रतिसादही दिला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. मात्र मनसेत संभाव्य युतीबाबत नाराजीचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र दुसरीकडे मनसेतल्या नेत्यांची विधानं पाहता या युतीबाबत मनसेत फारशी अनुकुलता नाही का?, असा सवाल उपस्थित झालाय. भोंगेविरोधातल्या आंदोलनात मनसैनिकांवर 17 हजार केसेस टाकल्या मग यासाठी उद्धव ठाकरे माफी मागणार का? असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.2017 मध्ये युतीच्या प्रयत्नात दगा कोणी दिला हे सर्वांना माहितीय असंही ते म्हणाले. तसेच मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी देखील अशी अभद्र युती होऊ नये, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असं ट्विट केल्यानं विविध चर्चा रंगल्या आहेत.
अशी अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 19, 2025
वादविवाद करणं योग्य नाही- संजय राऊतांचा सल्ला
महाराष्ट्राच्या शत्रूंसोबत राहणाराही महाराष्ट्राचा शत्रूच असल्याचं विधान ठाकरेंच्या शिवसेने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलंय. मोरारजी देसाई, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं राऊत म्हणालेत. तर उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद महाराष्ट्र हितासाठी असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणालेत. दोन भावांची सहमती होतेय त्यात वादविवाद करणं योग्य नाही, असा सल्लादेखील राऊतांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, घाई करू नका, थोडी वाट पाहा-
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यात काही वाईट नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. पण या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करू नका, थोडी वाट पाहा. ते दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ऑफर देणारे एक आणि त्याला प्रतिसाद देणारे दुसरे. त्यामुळे मी यावर जास्त काही बोलू शकत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
























