Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, अरे जाऊदे...
Eknath Shinde On Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच चिडल्याचे दिसून आले.

Eknath Shinde On Raj Thackeray And Uddhav Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाकरे बंधू एकत्र येणार का?, याची चर्चा राजकारणात नेहमी होते. आता खुद्द दोन्ही ठाकरे बंधूंनी यासाठी एकेक पाऊल पुढे टाकलंय. राज ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी लागलीच त्यांना प्रतिसादही दिला. उद्धव ठाकरेंच्या या साद-प्रतिसादामुळे राज्यातल्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाराष्ट्रातील राजकीय पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर स्वागतच आहे, असं सर्वजण म्हणताना दिसले. मात्र याचवेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच चिडल्याचे दिसून आले.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत, एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील त्यांच्या दरे गावात आहे. एकनाथ शिंदेंकडून यावेळी काही कामांची पाहणी सुरु होती. यादरम्यान एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने एकनाथ शिंदेंना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रश्न विचारला. यावर 'अरे जाऊदे यार....काय तू कामाचं बोल यार...', अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी संताप व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुणीही मतभेद विसरून एकत्र येत असतील तर त्यात काही वाईट नाही. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. पण या चर्चा माध्यमांमध्ये आहेत. घाई करू नका, थोडी वाट पाहा. ते दोघे एकत्र आले तर आम्ही त्याचे स्वागत करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ऑफर देणारे एक आणि त्याला प्रतिसाद देणारे दुसरे. त्यामुळे मी यावर जास्त काही बोलू शकत नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.




















