राज ठाकरे म्हणाले, दादांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, आता अजित पवार म्हणतात...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी, पुणे शहराची दुर्दशा आणि शहरातील तरुणाईवर भाष्य करताना त्यांनी खंत व्यक्त केली.
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर आपला मोर्चा राज्यातील इतर मतदारसंघात वळवला आहे. तिसऱ्या टप्प्यात बारामती मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी फुल्ल बॅटींग केल्यानंतर त्यांनी महायुतीच्या इतर उमेदवारांसाठी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. शिरुर, मावळ, अहमदनगर मतदारसंघात अजित पवारांनी काही नेत्यांना चांगलाच दम भरला. त्यानंतर आज बीडमध्ये महायुतीच्या उेमदवार पंकजा मुडेंसाठी (Pankaja Munde) परळीत सभा घेतली. येथील सभेत बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकारेंच्या (Raj Thackeray) भाषणाचा संदर्भही दिला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी, पुणे शहराची दुर्दशा आणि शहरातील तरुणाईवर भाष्य करताना त्यांनी खंत व्यक्त केली. त्यानंतर, राजकीय भाष्य करत अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळली. अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, शरद पवारांसोबत राहूनही त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. आता, राज यांच्या याच विधानाचा संदर्भ देत अजित पवारांनी बीडच्या सभेत भाषण केलं. बीडमध्ये सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं केंद्रस्थान असल्याने बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेंनी आजच्या सांगता सभेत दोन्ही दिग्गज मराठा नेत्यांना मैदानात उतरवले. उदनयराजे भोसले आणि अजित पवार यांची परळीत सभा झाली.
बीडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरु असतानाच उदयनराजेंची एंट्री झाली. त्यावेळी, छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांचं मी स्वागत करतो, असे अजित पवारांनी म्हटले. त्यानंतर, पकंजा मुंडे ह्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षाचा आणि विकासाचा वारसा घेऊन लढत आहेत. गोपीनाथ मुंडेनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलं. संपूर्ण मराठवाड्याला आपलं कुटुंब मानलं होतं. उपेक्षित, वंचित व बहुजन समाजाला सोबत घेऊन त्यांनी राजकारण केल्याचं अजित पवार म्हणाले. त्यानंतर, कालच राज ठाकरेंनी सभेत जाहीरपणे सांगितले, एक गोष्ट मी मान्य करेन, अजित पवार जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी कधी जातीपातीचं, नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊनच पुढे जाण्याची माझी भूमिका आहे. शिव-शाहू-फुले आंबेडकरांचे विचार घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो,असेही अजित पवार यांनी बीडमधील सभेत सांगितले.
दरम्यान, ही निवडणूक गावकी-भावकीची नसून देशाची निवडणूक आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी ही निवडून महत्त्वाची आहे. त्यामुळे, कुणीही भावनिक होऊन मतदान करू नका, आपल्याला विकास करण्यासाठी निधी हवा आहे. विकासासाठी निधी आणायचा असल्यास एक-दोन पावलं पुढे मागे करावे लागतात, असेही अजित पवार यांनी म्हटले.