Video: औवेसींसारख्या औलादी, सैन्य घुसवा, अड्डे उध्वस्त करा; मोदींसमोर राज ठाकरेंची तोफ धडाडली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन टप्प्यातील कार्यकाळावर मी बोलणार आहे, त्यातील पहिल्या 5 वर्षाबद्दल मी 2019 मध्येच बोललेलो आहे. मी जेव्हा टीका करायची तेव्हा टीका केली
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) प्रमुख उपस्थिती आज शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सांगता सभा पार पडली. या सभेतून महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे नरेंद्र मोदी असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मी जास्तवेळ भाषण करणार नाही, केवळ तीन टप्प्यात माझं भाषण पूर्ण करणार आहे. त्यातील, एक टप्पा झाला आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी मोदींसमोर महाराष्ट्राच्या अपेक्षांची यादीच वाचून दाखवली. तर, असदुद्दीन औवेसीचं (Asaduddin owaisee) नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे माझी महत्वाची मागणी असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. देशभक्त मुस्लिमांना सुरक्षित वावरण्यासाठी हे करा, असेही राज ठाकरेंनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तीन टप्प्यातील कार्यकाळावर मी बोलणार आहे, त्यातील पहिल्या 5 वर्षाबद्दल मी 2019 मध्येच बोललेलो आहे. मी जेव्हा टीका करायची तेव्हा टीका केली आणि जेव्हा कौतुक करायचं तेव्हा कौतुकही करतो, असे म्हणज राज ठाकरेंनी राम मंदिर व कलम 370 च्या मुद्द्यावरुन मोदींचे कौतुक केले. मोदींना मी खरोखर धन्यवाद देतो, आपण होतात म्हणूनच ते राम मंदिर होऊ शकलं, अन्यथा ते झालंच नसतं. नरेंद्र मोदींनी एक गोष्ट करुन दाखवली ती म्हणजे ट्रीपल तलाक, तलाक.. तलाक.. तलाक... म्हणून मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अन्यावर मोदींनी ही गोष्ट करुन सर्वात धाडसी काम केलंय, असं मला वाटतं, असे म्हणत ट्रीपल तलाक कायद्याचे स्वागत केले.
मी तुमच्यासमोर उभा आहे तो केवळ पुढील 5 वर्षांसाठी. महाराष्ट्राच्या आमच्या आपणाकडून खूप अपेक्षा आहेत. पहिली अपेक्षा आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, ही गोष्ट आपण कराल ही अपेक्षा करतो. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जावा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. शिवछत्रपतींचे गडकिल्ले हीच आमची संपत्ती, आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी, या किल्ल्यांचा विकास व्हावा, ही अपेक्षा आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात पूर्ण करावं, अशी अपेक्षाही राज ठाकरेंनी व्यक्त केली. तसेच, संविधानाला धक्का लागणार नाही हेही मोदींनी आणखी कणखरपणे सांगावे, असेही राज ठाकरेंनी म्हटले.
औवेसींसारख्या ज्या औलादी आहेत...- राज ठाकरे
राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून देशातील मुस्लीम बांधवांवरही भाष्य केलं, या देशात लाखो, करोडो देशभक्त मुस्लीम आहेत. या देशावर ते प्रेम करतात, त्यांचा या देशावर निष्ठा आहे. पण, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत ना, त्यांचा उद्देश केवळ 10 वर्षात त्यांना डोकं वरती काढता आलं नाही. डोकं वर काढण्यासाठी त्यांना काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही, म्हणून ते आज सगळ्यांना पाठिंबा देत आहेत. लाखोंच्या संख्येने, करोडोंच्या संख्येने मुस्लीम आपल्यासोबत आहेत, त्यांना सुरक्षा हवी आहे. त्यांना आदर हवा आहे, त्यांना देशामध्ये काम करायचं आहे. तो पिढ्या न पिढ्या येथे राहणारा आहे. पण हे मुठभर आहेत, ओवैसींसारख्या ज्या औलादी आहेत, त्यांचे जे अड्डे आहेत, ते अड्डे एकदा तपासून घ्या.. तिथे माणसं घुसवा, देशाचं सैन्य घुसवा आणि त्यांना उध्वस्त करून टाका. म्हणजे देशात सर्वांना सुरक्षित वावरता येईल, अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदींकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.