Raj Thackeray : राज ठाकरेंच्या मोर्चाची तारीख बदलली, 6 ऐवजी 5 जुलैला मोर्चा, दोन ऐवजी एकाच मोर्चासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा
Raj Thackeray : राज ठाकरेंनी मुंबईतील हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयाविरोधातील मोर्चाची तारीख बदलली आहे. हा मोर्चा आता 5 जुलौ रोजी निघेल.

मुंबई : पहिलीच्या वर्गापासून अभ्यासक्रमात हिंदीचा समावेश करण्याच्या मुद्याला महाराष्ट्रातून विरोध वाढत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत 6 जुलै रोजी पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमात हिंदीच्या समावेशाविरोधात मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता मोर्चा 5 जुलै रोजी होणार आहे. आता राज ठाकरे यांनी मोर्चाची तारीख बदलली आहे. राज ठाकरे यांनी मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन केलं आहे. दोन ऐवजी एकच मोर्चा काढण्यात यावा यासाठी मनसे नेत्यांकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती आहे.
राज ठाकरेंकडून मोर्चाची तारीख बदलल्याची माहिती
सस्नेह जय महाराष्ट्र,
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी आणि महाराष्ट्रातील जनतेनी या बदलाची नोंद घ्यावी.
आपला नम्र,
राज ठाकरे ।
कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा
राज ठाकरे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले, हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटलं तर ते (उद्धव ठाकरेंची शिवसेना) पण आलेच. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या लोकांशी बोलणार. कुठल्याही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला 6 जुलैला कळेल,असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
सस्नेह जय महाराष्ट्र,
— Raj Thackeray (@RajThackeray) June 26, 2025
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे… pic.twitter.com/BUN1Av0GSK
एकाच मोर्चासाठी हालचाली सुरु
त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीनं 7 जुलै रोजी मोर्चाचं आयोजन केलं आहे. उद्धव ठाकरेंनी 7 जुलैच्या मोर्चाला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. त्यानंतर मनसेची पत्रकार परिषद झाली. त्यात मनसेनं 6 जुलै रोजी मोर्चाचं आयोजन केलं. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते यांच्यासह त्रिभाषा समन्वय समितीकडून दोन ऐवजी एकच मोर्चा काढण्यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे.
बातमी अपडेट होत आहे...
























