Raj Thackeray & Uddhav Thackeray: मविआच्या काळातील त्रिभाषेसंदर्भातील जीआरवर ठाण्याच्या माणसाची सही; उद्धव ठाकरेंच्या बचावासाठी राज ठाकरे ढाल बनले?
Raj Thackeray: हिंदीसक्तीचा जीआर रद्द, तरीही मुंबईत विजयी सभा होणार. ठाकरे बंधू एकत्र येणार. महायुती सरकारने या मोर्चापूर्वी जीआर रद्द करुन आंदोलनातील हवा काढली होती. मात्र, ठाकरे बंधू तरीही एकत्र

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन्ही बंधू एकत्र आले होते. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 5 जुलैला सरकारच्या हिंदी सक्तीविरोधात मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यापूर्वीच महायुती सरकारने हिंदी सक्तीचा शासन आदेश मागे घेतला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारची बाजू मांडताना उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्रिभाषा धोरण राबवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच घेण्यात आला होता. त्यामुळे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारावं कुठल्या तोंडानं आंदोलन करता ?, असा सवाल फडणवीसांनी कालच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रश्नाबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना त्यांच्या सोमवारच्या पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्राबाबत आणि मराठी माणसाच्या आणि भाषेच्या विरोधात उद्या कोणीही असला तरी त्याला माझा विरोध असेल. उद्या उद्धव ठाकरे त्याठिकाणी असले तरी माझा विरोध असेल. मी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील निर्णयाबाबत आताच माहिती घेतली. त्या निर्णयात उच्चशिक्षण आणि प्राथमिक शालेय शिक्षण असा फरक होता. मला ही गोष्ट कानावर आली आहे. मात्र, मला अद्याप सगळा तपशील मिळालेला नाही. त्या आदेशावर ठाण्याच्या माणसाने सही केली होती, असे राज ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे का होईना, उद्धव ठाकरे यांचा मविआच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयावरुन बचाव केला. राज ठाकरे यांच्या या कृतीविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Thackeray Brothers: ठाकरे बंधू एकत्र येणारच
राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेऊन ठाकरे बंधुंकडून 5 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे प्रयोजन नष्ट केले होते. त्यामुळे राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली. याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, काल राज्य सरकारच्या निर्णयानंतर मला संजय राऊतांचा फोन आला. त्यांनी विचारलं, आपल्याला काय करायचं आहे? मी त्यांना म्हटलं की, मोर्चा तर रद्द करावा लागेल. त्यावर संजय राऊत म्हणाले की, विजयी मेळावा घेतला पाहिजे. मी त्याला होकार दिला. 5 तारखेला विजयी मेळावा घेऊयात, असेही बोललो. फक्त ठिकाण जाहीर नको करायला, असे मी संजय राऊतांना सांगितल्याचे राज यांनी म्हटले.
या विजयी मेळाव्याला पक्षीय लेबलं लावण्यात अर्थ नाही. हा मराठी माणसाचा विजय आहे. त्या दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे. मात्र, मराठी प्रसारमाध्यमांनी आणि सगळ्यांनी हा विषय लावून धरला, याचा मनला आनंद आहे. अशाबाबतीत सर्वांनी जागृत असले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
आणखी वाचा
हिंदी सक्तीचा जीआर रद्द, तरीही मुंबईत मोर्चा निघणार?; राज ठाकरेंनी 5 जुलैचा सगळा प्लॅन सांगितला!























