मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ती आमची प्राथमिकताच नाही!
Prithviraj Chavan On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
Prithviraj Chavan On Uddhav Thackeray मुंबई: आपल्यात काड्या घालणारी लोकं युतीमध्ये बसली आहेत. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोणी होणार? असं विचारलं जात आहे. पण मी आज सगळ्यांसमोर सांगतो... इथे शरद पवारसाहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, तुम्ही आता तुमच्यातील कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा, माझा त्याला पाठिंबा असेल, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा संदर्भात उद्धव ठाकरे (Uddhav Thacleray) स्पष्ट बोललेले आहेत. उद्धव ठाकरे आणि आमच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा झालेली आहे. पण ज्यांचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री झाला तर पाडापाडी होते असं मला वाटत नाही. महाविकास आघाडी म्हणून जागावाटप आणि निवडणुकांना समोर जाण्याची प्राथमिकता आहे. चेहरा ही आमची प्राथमिकता नाही, असं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचं मत व्यक्त केलं, आम्ही आमचं मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा विषयच नाही, आधी आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.तसेच जागा वाटपाच्या संदर्भात लवकरच आमची चर्चा सुरू होईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील निवडणुका घेण्यास काही हरकत नव्हती-
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर या निवडणुका पुढे ढकलल्या जातील त्याची स्पष्टता आली. महाराष्ट्रातील निवडणुका घेण्यास काही हरकत नव्हती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं देखील समजून घ्यायला हवं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
काही जिल्ह्यांमध्ये हिंसाचार सुरू आहे हे राज्यासाठी वाईट आहे. राज्यात सुरक्षा व्यवस्थीत ठेवणं ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. ही सरकारची जबाबदारी असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. सर्वांनी शांतता बाळगली पाहिजे असं आवाहन देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
भाजपच्या युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको. आम्ही 30 शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो. तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलून दाखवली होती.