(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संविधानावर डोकं टेकून वंदन, नेतेपदी निवड, नरेंद्र मोदी 9 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेणार!
PM Narendra Modi देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी नितीश कुमार, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी अनुमोदन केलं.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये NDA ने बहुमत मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी यांची NDA ने नेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर आता मोदींच्या शपथविधीची तारीख ठरली आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ येत्या 9 जून रोजी घेणार आहेत. 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता हा शपधविधी होत आहे. दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीचा प्रस्ताव ठेवला, त्याला गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, नितीश कुमार यांनी अनुमोदन केलं. नितीश कुमार म्हणाले, आमचं मोदींना पूर्ण समर्थन आहे, लवकरात लवकर तुम्ही शपथ घ्या, आम्ही पुढचे सर्व दिवस तुमच्या सोबत आहोत. यावेळी या निवडणुकीत काही इकडे तिकडे निकाल झाला, पण पुढच्यावेळी विरोधी सर्व हरतील, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या घटकपक्षांची आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक होत आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मंचावर विशेष स्थान देण्यात आलं. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह NDA च्या घटक पक्षाच्या सर्व अध्यक्षांना मंचावर विशेष स्थान मिळालं.
मोदींच्या एन्ट्रीला घोषणाबाजी
दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेंट्रल हॉलमध्ये एन्ट्री झाली. त्यांचं स्वागत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं. मोदींच्या एन्ट्रीवेळी सेंट्रल हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. 'स्वागत है भाई स्वागत है' अशा घोषणा देत मोदींचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सर्व खासदारांनी उभं राहून, टाळ्यांचा कडकडाट करुन मोदींचं स्वागत केलं.
संविधानाला वंदन
दरम्यान, मोदींनी सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी , सर्वात आधी संविधानाच्या प्रतीला वंदन केलं. संविधानाच्या प्रतीवर डोकं टेकवून मोदींनी वंदन केलं. यानंतर जे पी नड्डा यांनी पुष्पगुच्छ देऊन, मोदींचं स्वागत करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर NDA ला 293 जागा मिळाल्या आहेत. देशात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 272 इतका आहे.
VIDEO | Narendra Modi (@narendramodi) arrives at Parliament's Central Hall, bows before the Constitution.
— Press Trust of India (@PTI_News) June 7, 2024
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/86Mvx6DDZ9
नड्डा यांच्याकडून स्वागत
दरम्यान, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सर्व खासदारांचं स्वागत केलं. नड्डा म्हणाले, दहा वर्षांपूर्वी देशात उदासीनता होती, आता मोदींच्या नेतृत्त्वाखाली विकास होतोय. दहा वर्षांपूर्वी भारत देश उदासीन होता. दहा वर्षांपूर्वी काहीही होत नव्हते. मात्र आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली विकास होत आहे. गरिबांना ताकद मिळाली, युवकांच्या आशांना पंख फुटले, दलितांना पुढे जाण्यासाठी मार्ग निर्माण करण्यात आला, असे नड्डा म्हणाले.
मोदींचे नाव एनडीएच्या गटनेतापदासाठी सर्वोत्तम- राजनाथ सिंह
Rajnath Singh : सध्या भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडला. राजनाथ सिंह म्हणाले मी सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन करतो. आज आपण एनडीएच्या संसदीय दलाचा नेता निवडण्यासाठी जमलो आहोत. मोदी यांचे नाव या पदासाठी सर्वोत्तम आहे. मंत्रिमंडळात असताना मी त्यांचा सहकारी म्हणून त्यांची दूरदृष्टी पाहिलेली आहे. त्यांचे काम संपूर्ण देशाने पाहिले आहे. एनडीएच्या सरकारने दहा वर्षे मोदी यांच्या नेतृत्त्वात काम केले, त्याची भरतच नव्हे तर संपूर्ण जगात प्रशंसा होत आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्याकडून नरेंद्र मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला मान्यता!
नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी एनडीएतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आंध्र प्रदेशचे नेते तथा टीडीएस पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीदेखील मोदी यांच्या नावाला पाठिंबा दिला. नरेंद्र मोदी यांच्याकडे दूरदृष्टी आहे. आज भारताला योग्य वेळेला योग्य नेता मिळत आहे. भारतासाठी ही मोठी संधी आहे. ही संधी गमावल्यास ती पुन्हा येणार नाही. जगातील इतर देशांचा वृद्धी दर हा दोन ते तीन टक्के आहे. पण गेल्या दहा वर्षांपासून आपल्या देशाचा वृद्धीदर मोठा आहे, असं चंद्राबाबू म्हणाले.
नितीश कुमार यांची फटकेबाजी
दरम्यान, यावेळी नितीश कुमार यांनी यावेळी दमदार फटकेबाजी केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोदींच्या नेतेपद निवडीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आज हा फार आनंदाचा दिवस आहे. दहा वर्षांपासून मोदी हे पंतप्रधान आहेत. ते पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत. त्यांनी देशाची सेवा केली. आम्ही संपूर्ण कार्यकाळ त्यांच्यासोबत राहणार आहोत. विरोधकांनी आतापर्यंत काहीही काम केलेलं नाही. बिहार, संपूर्ण देश आता पुढे जाणार आहे. आम्ही पूर्णवेळ मोदी यांच्यासोबत असणार आहोत, असं नितीश कुमार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शेरोशायरीतून पाठिंबा
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतेपदी निवडीला पाठिंबा दिला.
शिवसेना-भाजपची युती हा 'फेविकॉल का जोड', तो कधीही तुटणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. कारण आज नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात येत आहे. आम्ही या प्रस्तावाला अनुमोदन देत आहोत. गेल्या दहा वर्षात मोदी यांनी या देशाचा विकास केला. या देशाला पुढे नेले. या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. या देशाला नवी ओळख देण्याचे काम केले. खोटा अजेंडा राबवला, लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. पण खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना लोकांनी नकारलं आहे. लोकांनी मोदी यांना स्वीकारलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
अजित पवार यांचा पाठिंबा
दरम्यान, नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मी या प्रस्तावाचे समर्थन करतो, असे अजित पवार म्हणाले.
संबंधित बातम्या