मोठी बातमी : प्रतिभा धानोरकरांकडून विजय वडेट्टीवारांना पराभूत करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन
Pratibha Dhanorkar : चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पराभव करण्याचे आवाहन केले आहे.
Pratibha Dhanorkar, चंद्रपूर : "अल्पसंख्याक समाजातील लोकं आपलं प्रतिनिधित्व करत आहेत. आता ही परंपरा बदलली पाहिजे, मॅनेज होऊ नका. पक्ष कुठलाही असला तरी कुणबी समाजाच्या उमेदवाराला निवडून द्या", असं म्हणत चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात आज (दि.8) कुणबी समाजाचे महाअधिवेशन पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.
प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, ब्रम्हपुरीमध्ये किंवा गडचिरोलीत अल्पसंख्याक समाजाचे लोक आपल्यावर प्रतिनिधीत्व करत आहेत. ही परंपरा आता बदलली पाहिजे. जेवढी ज्याची टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदारी असायला हवी. आता वेळ आली आहे. आपण आपण आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यात एखाद्याने खोटी आश्वासनं दिली की, आपले लोक मॅनेज होतात. कुठेतरी आपण हे थांबवलं पाहिजे.
ब्रम्हपुरी मतदारसंघातून कुणबी समाजातील व्यक्तीला तिकीट द्यावे, यासाठी गळ घालणार : परिणय फुके
चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे विजय वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचे समाज बांधवांना अप्रत्यक्ष आवाहन केले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात आज कुणबी समाजाचे महाअधिवेशन होते. या अधिवेशनात बोलताना भाजप आमदार परिणय फुके यांनी आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींना ब्रम्हपुरी मतदारसंघातून कुणबी समाजातील व्यक्तीला तिकीट द्यावे, यासाठी गळ घालणार असल्याचं वक्तव्य केलं. फुके यांच्या याच मागणीचा धागा पकडून धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचे आवाहन कुणबी समाजाला केले.
प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवारांमधील वाद सुरुच
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी विजय वडेट्टीवार प्रयत्न करत होते, असा आरोप सातत्याने करण्यात आलाय. शिवाय मला उमेदवारी मिळू नये, यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना आपल्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली, पैशाचे आमिष दाखविल्याचा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला होता. लोकसभा निवडणुकीवेळी धानोरकर यांच्याऐवजी वडेट्टीवार त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे कुणबी समाजाने वडेट्टीवार यांच्या विरोधात बॅनरबाजी देखील केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामधील संघर्ष अजूनही संपलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
अजित पवारांचं बारामतीतील 'ते' वक्तव्य नेमकं कशामुळे? सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे की..; राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले कारण...