बीडच्या रेल्वेत श्रेयवादाची शिट्टी; नांगरणी, पेरणी कोणी केली अन् कापणीला बजरंग बाप्पा आले, पंकजा मुंडेंचा टोला
खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे नाव घेत केली भाषणाला सुरुवात केली. यावेळी, सोनवणे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेताच उपस्थितांमध्ये उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला.

बीड : मराठवाड्याच्या चारही बाजूंनी रेल्वेचं (Railway) जाळं पसरलं होतं, पण बीड (Beed) जिल्हा रेल्वे कनेक्टीव्हीटीपासून वंचित होता. त्यामुळे, बीडमध्येही झूक झूक आगीनगाडी आली पाहिजे, असे स्वप्न येथील प्रत्येकाने पाहिलं होतं. बीडमधील लोकप्रतिनीधींनीही बीडच्या रेल्वेचं स्वप्न पाहिलं अन् ते स्वप्नात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर, आज 17 सप्टेंबर 2026 रोजी बीडकरांचे हे स्वप्न सत्यात उतरले असून बीड ते अहिल्यानगर मार्गावर बीडमधून पहिली रेल्वे धावत आहे. या बीड रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang sonavane) यांनी बीडची रेल्वे मुंबईपर्यंत आणि हायस्पीड करण्याची मागणी केली. तर, पकंजा मुंडेंनी (Pankaja munde) बीड रेल्वेसाठी दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी दिलेल्या योगदानाची आठवण करुन दिली. तसेच, आपल्या भाषणात खासदार बजरंग सोनवणेंना टोलाहील लगावला.
खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे नाव घेत केली भाषणाला सुरुवात केली. यावेळी, सोनवणे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेताच उपस्थितांमध्ये उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. तर, तुम्ही मला निवडून दिलं, मी सालगडी म्हणून मी काम करतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात कामाचा धडाका लावला आहे. अजित पवारांना माझी विनंती आहे, आम्हाला हाय स्पीड रेल्वे सुरू झाली पाहिजे. हायस्पीड रेल्वेसाठी दोन सबस्टेशन होणार आहेत आष्टी आणि शिरसाळा येथे. आज डिझेल इंजिनवर आपली रेल्वे चालणार आहे. सोलापूर-संभाजीनगर रेल्वेसाठी मी 9 करोड रुपयाचा निधी मागून घेतला आहे. मी आणखी दोन मागण्या करणार आहे, पुण्याचा ढाण्या वाघ म्हणून अजितदादांची ओळख आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी नागपूरप्रमाणे बीडमध्येही धडाकेबाज काम करावे. मुख्यमंत्र्यांनी आणि दादांनी पाण्यासाठी काम करावे, रेल्वेच्या अधिकाऱ्याने मला का टाळलं माहीत नाही, पण मला दादांनी भाषणाची संधी दिली, असे म्हणत अजित पवारांचे सोनवणेंनी आभारही मानले.
कष्टाळू आणि कर्तृत्वत्वान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ही रेल्वे सुरू होत आहे, असे म्हणत पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. खासदार प्रीतम मुंडेंची आठवण काढत पंकजा मुंडे यांनी त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. बीडच्या दबंग खासदार म्हणून प्रीतम मुंडे यांचं नाव पहिल्यांदा येतं, असे म्हणत खासदार सोनवणेंना टोलाही लगावला. तसेच, नांगरणी, पेरणी कोणी केली आणि बजरंग बाप्पा कापणीच्या वेळी आले, असेही पंकजा यांनी म्हटले.
वडिलांची आठवण, पंकजा भावूक
या रेल्वेसाठी कोणाचं योगदान किती हे सगळ्यांना माहिती आहे, मी श्रेयाच्या विषयात जाणार नाही. मी अखेरच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याची पालक म्हणून भूमिका बजावणार आहे. केशर काकू क्षीरसागर यांच्यापासून ते बजरंग बप्पा सोनवणेंपर्यंत मनापासून या रेल्वेसाठी सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. या रेल्वेसाठी प्रीतम मुंडेंची भूमिकाही महत्वाची राहिली आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी आर्थिक उन्नतीसाठी रेल्वे महत्वाचे असल्याचे मला सांगितले, मुंडे साहेबांच्या काळात विरोधी पक्षाचे खासदार असताना सर्वाधिक 450 कोटींचा निधी आला होता. या रेल्वेला खरे स्वरुप मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले, या प्रसंगी गोपीनाथ मुंडेंची आठवण येते, असे म्हणत पंकजा मुंडे भावूक झाल्याचंही दिसून आलं.
बारामतीएवढी आर्थिक मदत द्या
पंतप्रधान मोदींनी 2292 कोटी निधी या रेल्वेला एका झटक्यात दिला. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पियुष गोयल, रावसाहेब दानवे यांनी या रेल्वेसाठी मदत केली. देवेंद्रजींचे या रेल्वेसाठी मी कोटी कोटी आभार मानते बीड जिल्ह्याने आपला स्वाभिमान कधी गहाण टाकला नाही, आजचा सुवर्णयोग आहे. दादा तुम्ही आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही पण तेवढीच आर्थिक मदत द्या. नितीन गडकरींनी आम्हाला 10 हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग दिले, असेही पंकजा यांनी म्हटले. दरम्यान, आज सगळ्यांनी नगरपर्यंत जावं, श्रेयवादाने या रेल्वेकडे पाहू नका. गोपीनाथ मुंडे का ये सपना पुरा करुंगा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, अशी आठवणही पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितली.
बीडच्या रेल्वेची नेमकी वैशिष्ट्य काय?
अहिल्यानगर-बीड-परळी हा 261 किलोमीटरच रेल्वे लोहमार्ग आहे.
अहिल्यानगर ते बीड 167 किमी रेल्वेमार्गाचे आज लोकार्पण
अहिल्यानगर बीड मार्गादरम्यान 16 रेल्वे स्थानक असणार आहेत.
बीडच्या पालवण भागात बीड रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे.
अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवासाला 5 तासांचा अवधी लागणार आहे.
बीड ते अहिल्यानगर रेल्वे प्रवासाला 40 रुपये तिकीट भाडे आकारण्यात येत आहे.
























